परतवाडा : अचलपूर परतवाड्यात डेंग्यू सदृश्य आजाराने नागरिक त्रस्त आहेत. ग्रामीण भागातही या डेंग्यू सदृश्य आजाराचा शिरकाव झाला आहे. गत महिन्यापासून हे डेंग्यूसदृश रुग्ण निघत आहेत. खासगी पॅथॉलॉजी लॅबमध्ये या रुग्णांची एन-एस १ डेंग्यू टेस्ट पॉझिटिव्ह येत आहे. दररोज दोन ते तीन रुग्ण या टेस्टमध्ये डेंग्यू पॉझिटिव्ह निघत आहेत. हे रुग्ण खासगी रुग्णालयांत उपचारार्थ दाखल होत आहेत. अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल काही रुग्णसुद्धा डेंग्यू सदृश आजाराने ग्रस्त आहेत.
स्थानिक सरकारी यंत्रणेने जवळपास ४० डेंग्यू सदृश्य रुग्णांचे रक्तजल नमुने घेतले. या रुग्णांची डेंग्यूचे संशयित रुग्ण म्हणून शासनदप्तरी आरोग्य यंत्रणेने नोंद घेतली खरी, पण घेतलेले हे रक्तजल नमुने स्थानिक आरोग्य यंत्रणेने वरिष्ठ यंत्रणेकडे पाठविले आहेत. ते एक महिन्यापासून डेंग्यू सदृश रुग्ण शहरी व ग्रामीण भागात निघत आहेत. या रुग्णांमध्ये रक्तातील प्लेटलेट्स आणि डब्ल्यू आरबीसी वेगाने घटत आहेत. श्वेतपेशींची संख्याही कमी होत आहे. यातच नॉन डेंग्यू व्हायरल इन्फेक्शनचे रुग्णही वाढत आहेत.
शासकीय यंत्रणा मानेना
खासगी पॅथॉलॉजी लॅबमधील एन एस वन डेंग्यू टेस्ट ही अत्यंत विश्वसनीय मानल्या जाते. या आधारेच खासगी रुग्णालयात औषधोपचार घेऊन रुग्ण बरे होत आहेत. पण, शासकीय यंत्रणा हे डेंग्यू पॉझिटिव्ह अहवाल मानायला तयार नाही. संशयित डेंग्यू रुग्णांची संख्या बघता, स्थानिक शासकीय यंत्रणेने, उपचारार्थ खासगी रुग्णालयात दाखल होणाऱ्या डेंग्यू सदृश किंवा डेंग्यू पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती, शासकीय यंत्रणेला कळविण्याचे निर्देश खासगी रुग्णालयांना दिले आहेत. डेंग्यू बाबत शासकीय हिवताप यंत्रणेने अचलपूर नगरपालिकेलाही पत्र देऊन आवश्यक उपाययोजना करण्यास सुचविले आहे.
कोट
एनएस वन टेस्टअंतर्गत रुग्ण डेंग्यू पॉझिटिव्ह निघत आहेत. डेंग्यूकरिता ही टेस्ट अत्यंत विश्वसनीय आहे. मागील एक महिन्यापासून हे रुग्ण निघत आहेत.
- डॉ. ओमप्रकाश बोहरा, एमडी पॅथॉलॉजी, परतवाडा
कोट २
डेंग्यू पॉझिटिव्ह व डेंग्यू सदृश्य रुग्ण उपचारार्थ रुग्णालयात दाखल होत आहेत. त्यांची एनएसवन डेंग्यू टेस्ट पॉझिटिव्ह येत आहे. उपचारार्थ दाखल या रुग्णांची माहिती स्थानिक शासकीय यंत्रणेला दिली जात आहे. ही यंत्रणा रुग्णालयात येऊन किंवा रुग्णांच्या घरी जाऊन त्यांचे रक्तजल नमुने घेत आहे.
- डॉ. कमल अग्रवाल, एमडी, परतवाडा
कोट
ज्या भागात रुग्ण निघाल्याची माहिती मिळते त्या भागात सूचनेनुसार योग्य ती फवारणी व स्वच्छतेसह आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहे. दोन्ही शहरात नाल्या आणि गटारांची सफाई नियमितपणे केल्या जात आहे. अचलपूर नगरपालिका क्षेत्रात परिणामकारक फवारणी करण्याकरिता निविदा काढण्यात आली आहे.
- संदीप ककरानिया, आरोग्य सभापती, पालिका अचलपूर