वरूड (अमरावती) : सुधारित नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ शनिवारी शहरातून महारॅली काढण्यात आली. मराठी शाळेच्या प्रांगणातून निघालेल्या या या महारॅलीत हजारो नागरिक, व्यापारी सहभागी झाले. हातात भगवे झेंडे आणि तिरंगा घेऊन, वंदे मातरम्च्या जयघोषात देशात हा कायदा त्वरित लागू करण्याची मागणी करण्यात आली. दुपारी तीन वाजेपर्यंत बाजारपेठ बंद ठेवून व्यापाºयांनी रॅलीत सहभाग नोंदविला.
लोकाधिकार मंच आणि विविध शेकडो संघटनाच्यावतीने सकाळी १० वाजता समर्थन रॅलीला सुरुवात झाली. पोलीस ठाण्यापासून सावता चौक, मेन रोड, महात्मा फुले चौकातून पुढे आल्यानंतर रॅलीचे सभेत रुपांतर झाले. यावेळी माजी कृषिमंत्री अनिल बोंडे, मोरेश्वर वानखडे, लोकेश अग्रवाल, गिरीधर देशमुख, जगदीश उपाध्याय, नगराध्यक्षा स्वाती आंडे, शेंदूरजनाघाटचे नगराध्यक्ष रुपेश मांडवे यांनी सुधारित नागरिकत्व कायदयाच्या समर्थनार्थ मार्गदर्शन केले. भारतमातेच्या वेशभूषेत चिमुकलीसुद्धा व्यासपीठावर होती. गगनभेदी घोषणांनी शहर दुमदुमून गेले होते. विरोधक केवळ राजकारण करीत असून देशहिताच्या या कायद्याला सर्वांनी समर्थन द्यावे, असेही आवाहन यावेळी करण्यात आले.
या महामोर्चात लोकाधिकार समितीचे इंद्रभूषण सोंडे, नरेश घोडसाडे, जया नेरकर, माया यावलकर, सोनल चौधरी, राजू सुपले, युवराज आंडे, नंदू विघे, मंगेश ढोरे, अशोक नानोटकर, विक्रम काळे, संदीप तरार, आनंद खेरडे, कैलास उपाध्याय, रितेश शहा, गोपाल मालपे, हेटे, दिलीप राठी, किशोर भगत, रमेश हुकूम, संतोष निमगरे, मनोज माहूलकर, मनोज गुल्हाणे, दिलीप टाकरखेडे, प्रवीण खंडेलवाल, देवेंद्र बोडखे, शिवा शिवहरे, युवा व्यापारी संघ, बजरंग दल, तालुका व्यापारी संघटना, महिला विकासमंच, भाजपा व्यापारी संघटना, जॉयन्ट्स ग्रुप, ओबीसी मंच, भारतीय जनता पार्टी, विश्व हिंदू परिषद, आर्ट आॅफ लिव्हिंग आदी संघटना सहभागी झाल्या होत्या.