फोटो पी ११ दयार्पूर
दर्यापूर : शहरात गेल्या काही दिवसांपासून लस मिळत नसल्याने नागरिकांना लसीकरण केंद्रावरून घरी परतावे लागत आहे. मंगळवारी लस उपलब्ध होत असल्याचे समजताच शहरातील नागरिकांनी सकाळी सहा वाजल्यापासूनच लसीकरण केंद्रांवर गर्दी केली होती. प्रत्येक नागरिकामध्ये किमान सहा फुटाचे अंतर ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे. परंतु त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे फिजिकल डिस्टन्सिंग ठेवण्यात येत नसल्याचे चित्र दिसून आले.
मंगळवारी ४५ वर्षांवरील नागरिकांना ज्यांचा दुसरा डोस बाकी आहे. त्यांना कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन देण्यात आली. सकाळी कोविशिल्ड व दुपारी दोन वाजल्यानंतर कोव्हॅक्सिन देण्यात आली. ज्यांना कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस घ्यायचा होता, त्यांनी सकाळी सहा वाजल्यापासून रांगेत नंबर लावून ठेवला होता. मात्र, सुरुवातीला कोविशिल्ड देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. चार तास रांगेत राहिल्यानंतर कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस घेण्याकरिता बोलावण्यात आले. यामुळे काही वेळ लसीकरण केंद्रावर गोंधळ निर्माण झाला होता. त्यानंतर उपजिल्हा रुग्णालय येथील अधीक्षक डॉ. डाबेराव यांनी लसीकरण केंद्रावर येऊन ज्येष्ठ नागरिकांची समजूत काढली.
कोट
नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी लसीकरणास आलेल्या नागरिकांना टोकन देऊन दिलेल्या वेळेवर त्यांना लस घेण्याकरिता बोलावण्यात येईल. जेणेकरून त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची नागरिकांची गैरसोय होणार नाही व प्रत्येक नागरिकाकडून सामाजिक अंतराचे पालनसुद्धा होईल.
डॉ. डाबेराव, अधीक्षक
उपजिल्हा रुग्णालय
बॉक्स
लस कमी नोंदणी अधिक
४५ वर्षांवरील नागरिकांना मंगळवारी दुसरा डोस देण्यात आला. मात्र, पुरेशी लस नसल्याने काही नागरिकांना निराश होत घरी परतावे लागले. मंगळवारी कोविशिल्डचे २७०, तर कोव्हॅक्सिनचे ७० डोस देण्यात आले.