महत्त्वाच्या ठिकाणी कडक बंदोबस्त : पोलिसांच्या साप्ताहिक रजा रद्द, बीडीडीएस सज्जअमरावती : गुजरातमध्ये लष्कर-ए-तोएबा आणि जैश-ए-मोहम्मद या संघटनेचे दहा अतिरेकी शिरल्याच्या माहितीवरून राज्यभर अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर अमरावती शहरातही अलर्ट जारी करण्यात आला असून पोलिसांकडून शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच पोलिसांच्या साप्ताहिक सुट्ट्या रद्द करून त्यांना बंदोबस्तात उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी दहा पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या असून शहरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त लावला आहे. गुजरातच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्याच्या उद्देशाने शहरातील महत्त्वाची देवस्थाने, बसस्थानक, रेल्वे स्टेशन, लॉज आदी ठिकाणी पोलीस तैनात राहतील. शहर पोलिसांनी शहरातील ११ महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी, तसेच पाच अतिसंवेदनशील ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. वर्दळीच्या ठिकाणी तपासणीअमरावती : शहरातील सात मोठ्या मंदिरांवरही पोलिसांची करडी नजर राहणार आहे. १३ फिक्स पॉर्इंटवर लक्ष पुरविले जात आहे. पोलीस निरीक्षकांसह ३१ पोलीस उपनिरीक्षक व १४७ पोलीस कर्मचारी तैनात केले आहेत. याशिवाय ‘डॉग स्कॉड व बॉम्बशोधक पथक’ शहरातील विविध वर्दळीच्या ठिकाणांची तपासणीसुध्दा केली जात आहे.गुजरातच्या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या उपाययोजना घेण्यात येत आहे. विशेष पोलीस बंदोबस्त तसेच अतिरिक्त पोलीस कुमक तैनात करण्यात आली आहे. रेल्वे स्थानकासह बसस्थानक आणि गर्दीच्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. - दत्तात्रेय मंडलिक, पोलीस आयुक्त. बसस्थानक अतिरेक्यांचे सॉफ्ट 'टार्गेट' ?अमरावती : शहरातील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्नशील पोलीस आयुक्तांनी अमरावतीकरांच्या सुरक्षेचा मुद्दा हाती घेतला आहे. बसस्थानके अतिरेक्यांचे ‘सॉफ्ट टार्गेट’ असू शकतात, अशी दाट शक्यता लक्षात घेऊन त्यांनी अधिनस्थ अधिकाऱ्यांना सुरक्षेसाठी उपाययोजना सुचवून अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत.अमरावती मध्यवर्ती स्थानकावर सुध्दा प्रचंड गर्दी असते. यात प्रवाशांसह फेरीवाले आणि प्रवाशांच्या नातलगांचादेखील समावेश असतो. त्यामुळे बसस्थानक हे सदैव गर्दीने फुललेले ठिकाण असते. त्यामुळेच बसस्थानके अतिरेक्यांचे सॉफ्ट टार्गेट ठरू शकतात. बसस्थानकामध्ये समाजकंटक किंवा आतंकवाद्यामार्फत बॉम्बस्फोट अथवा घातपात घटना घडवून आणल्यास जीवितहानी संभवते. परिणामी सुरक्षेसाठी पोलीस आयुक्तांनी स्वत: लक्ष घातले आहे. महिला प्रवासी मदत केंद्र उभारणारअमरावती : उपाययोजना सुचवून त्याची अंमलबजावणी करण्याच्या निर्देशवजा सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. यात महिलांच्या सुरक्षिततेवर अधिकाधिक भर देण्यात आला आहे. अनुचित घटना टाळण्याच्या दृष्टिकोनातून रेल्वेस्टेशन व बस स्थानकावर महिला प्रवासी मदतकेंद्र स्थापण्यात येणार आहे. बसस्थानक प्रमुखांच्या सहकार्याने महिलांची सुरक्षितता अबाधित राहावी, यासाठी हे सकारात्मक पाऊल उचलले आहे. महिला प्रवासी मदत केंद्राजवळ वाहतूक कर्मचारी अपेक्षित आहेत. वाहनांच्या पार्किंगचे नियोजनउपाययोजना राबविण्यासाठी पोलीस प्रशासनाने पुढाकार घेतला असला तरी पार्किंगसंदर्भातील विषय आगार प्रमुखांच्या अखत्यारित आहे. प्रवाशांसह नातेवाईकांना सोडण्यास अथवा घ्यायला येणाऱ्या वाहनांचा मुद्दा निकाली काढण्याचे आदेश पोलीस प्रशासनाने दिले आहेत. याशिवाय बसस्थानक परिसरातील सायकलरिक्षा, आॅटोरिक्षांचा वाहतुकीस अडथळा होऊ नये, याबाबत वाहतूक शाखेला नियोजन करावयाचे आहे. (प्रतिनिधी)
शहरात ‘अलर्ट’
By admin | Published: March 08, 2016 12:02 AM