अमरावती : कोरोना संसर्ग काळात रखडलेली शहर बससेवा आता लवकरच पूर्ववत होणार आहे. महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी याबाबत सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे पहिल्या टप्प्यात बडनेरा ते नवसारी, अशा लांब पल्ल्याच्या बससेवा लवकरच प्रवाशांना उपलब्ध होणार आहे.
कोरोना संसर्गामळे शहर बससेवा एप्रिल महिन्यापासून बंद करण्यात आली. महापालिकेची ही सेवा खासगी कंत्राटदाराकडून पुरविण्यात येते. मिशन बिगीन अगेनमध्ये सुरू होण्याची अमरावतीकरांची अपेक्षा होती. मात्र, बससेवा सुरू करण्यास मुहूर्तच मिळाला नाही. आता आयुक्तांनी स्वतः ही सेवा सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. कंत्राटदारास बसेस सुरू करण्यात प्रादेशिक परिवहन विभागाकडून अडचणी जाऊ लागल्याने सेवा सुरू होण्यास विलंब होत आहे. परिणामी नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. आयुक्तांद्वारा सहा-सात बसेस सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आहे. येत्या आठवड्यात शहर बस प्रवाशांच्या सेवेत उपलब्ध होण्याची शक्यता आहे.