अमरावती : शहरात आता ऑनलाईन शस्त्र खरेदीस प्रतिबंध करण्यात आले आहे. त्यासंदर्भाचे आदेश पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी बुधवारी काढले असून, ऑनलाईन शस्त्रांची विक्री करणाऱ्या कॉमर्स प्लॅटफार्मधारक विविध कंपन्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.
शहरात काही ई- कॉमर्स प्लॅटफॉर्म उदा. ‘फ्लिपकार्ट’ ‘अमेझॉन’‘शाॅपक्लूज डॉट कॉम’ आदी कंपन्या या धारदार शस्त्रे ( चाकू), जी गुन्ह्यांमध्ये वापरली जावू शकतात, अशा शस्त्रांची विक्री त्यांच्या ऑनलाईन साईटवरून करीत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले होते. गुन्हेगारांना ते शस्त्र घरपोच मिळायचे. त्यामुळे गुन्हे सुद्धा वाढले होते. त्या अनुषंगाने पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी त्याला प्रतिबंध करण्याकरिता फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम १४४ प्रमाणे आदेश बुधवारी पारित केला. या आदेशाद्वारे सदर कंपन्याच्या माध्यमातून तीक्ष्ण धार असलेल्या प्राणघातक शस्त्र, ज्याच्या पात्याची लांबी ९ इंचापेक्षा जास्त किंवा ज्यांचे पात्याची रुंदी २ इंचापेक्षा जास्त असून, ज्याचे बाळगणे हे भारतीय हत्यार कायदा कलम ४ सहकलम २५ अन्वये दखलपात्र गुन्हा होत असल्याने अशा शस्त्र विक्रीवर या आदेशान्वये अमरावती शहरात आलेली आहे तसेच शस्त्र वगळता म्हणजे ज्याची लांबी नऊ इंचापेक्षा कमी व रुंदी दोन इंचापेक्षा कमी असलेल्या शस्त्रांची ऑनलाईन खरेदी करणाऱ्या ग्राहकांची विस्तृत तपशीलासह माहिती शहर पोलिसांना वेळोवेळी पुरविण्याबाबत आदेशित करण्यात आले आहे. या आदेश शहर आयुक्तलयांतर्गत येणाऱ्या सर्व पोलीस ठाण्यातील परिसरात निर्गमित झाल्यापासून ६० दिवसापावेतो लागू असणार आहे. यासंदर्भाची ऑनलाईन शस्त्रांची विक्री करणाऱ्या कंपन्यांना सदरची नोटीस देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.