फोटो - येणार आहे. कॅप्शन - वरूड तहसील प्रशासनाबाबत हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
अधिकाऱ्याचा अजब कारभार, नागरिकांनी लावले वरिष्ठाना फोन, कारवाईची प्रतीक्षा
वरूड : स्थानिक तहसील कार्यालयातील एक नायब तहसीलदार पांदण रस्त्याचा निवाडा करायला गेले अन् येताना बेनोडा लगतच्या एका बारमध्ये जाऊन यथेच्छ मद्यपान व जेवणाचा आनंद लुटला. नेमके याच वेळी अनेक नागरिक कामाकरिता ताटकळत बसले होते. नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांसह वरिष्ठांशी संपर्क साधून वस्तुस्थिती मांडली. आता त्यांना कारवाईची प्रतीक्षा आहे.
सूत्रांनुसार, नायब तहसीलदार देवानंद धबाले यांच्याबाबत सांगितला जात असलेला हा प्रकार गुरुवारी दुपारी घडला. एका पांदण रस्त्याचा निवाडा करण्याकरिता गुरुवारी दुपारच्या सुमारास ते गेले होते. वाद निपटून ईत्तमगावहून परत येताना बेनोडालगत एका बार-रेस्टाॅरेंटमध्ये नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी आणि काही खासगी इसम बसले होते. यावेळी जेवणासह मद्याचा आस्वादही त्यांनी घेतला. त्याच वेळी काही लोक कामानिमित्त तहसील कार्यालयात ताटकळत बसले होते. ही वार्ता कानी पडताच उपस्थित नागरिकांनी नायब तहसीलदारांवर कारवाईची मागणी प्रभारी तहसीलदार नंदकुमार घोडेस्वार यांच्याकडे केली. त्यांनी दखल न घेतल्याने संतापलेल्या नागरिकांनी जिल्हाधीकारी आणि उपविभागीय अधिकारी यांना दूरध्वनीवरून माहिती दिली .
उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले यांनी तहसीलदारांना वैद्यकीय तपासणीबाबत आदेश दिले. परंतु, महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सदर नायब तहसीलदाराला पाठीशी घालून तहसीलदारांच्या कार्यालयात आश्रय दिल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. याबाबत तहसीलदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध झाले नाहीत.
------------
गुरुवारी वरूडमध्ये नायब तहसीलदारांनी नागरिकांना ताटकळत ठेवून एका बारमध्ये जाऊन धिंगाणा घातल्याचे नागरिकांचे फोन आले. मी प्रभारी तहसीलदार घोडेस्वार यांना सदर नायब तहसीलदारांची वैद्यकीय तपासणी करण्यास सांगितले होते. त्याचे काय झाले, याची चौकशी करून कारवाई करू.
- नितीनकुमार हिंगोले, उपविभागीय अधिकारी
------------
तीव्र आंदोलनाचा इशारा
गुरुवारी झालेली घटना प्रशासनाची बदनामी करणारी आहे. एसडीओ हिंगोले यांनी वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश देऊनसुद्धा तहसीलदारांनी आदेशाला केराची टोपली दाखवली. नायब तहसीलदार धबाले यांच्याविरुद्ध कारवाई न झाल्यास आम आदमी पार्टी तीव्र आंदोलन छेडेल.
- सचिन आंजीकर, वरूड