फोटो : महावितरणची लाईन दाखविणारा
पान २ ची लिड
परतवाडा : महावितरण कंपनीच्या अचलपूर कार्यालयाच्या कारभारामुळे सर्वसामान्य नागरिकांसह रुग्णांना कमालीचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. जुळ्या शहरांना लागून असलेल्या देवमाळी, कांडली व इतर परिसरात पूर्वसूचना न देताच वाटेल तेव्हा तीन ते चार तास पुरवठा खंडित केला जात असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे. महावितरणच्या या लालफीतशाहीचा फटका शासकीय रुग्णालयात दाखल रुग्णांनादेखील बसत आहे. गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांना विजेच्या लपंडावामुळे ऑक्सिजन घेण्यास अडचण होत असल्याचे वास्तव आहे.
जिल्ह्यासह अचलपूर तालुक्यात ९ मेपासून आठवड्याभराचे कडक निर्बंध असलेले लॉकडाऊन सुरू आहे. सर्व व्यवहार बंद आहेत. त्यामुळे नागरिक घरातच आहेत. दुसरीकडे कोरोना झाल्याने अनेक रुग्ण गृह विलगीकरणात आहेत. परंतु, विद्युत पुरवठा सतत आणि वाटेल तेव्हा खंडित होत आहे. पूर्वसूचना न देता पावसाळ्यापूर्वीच ट्री-कटिंग, तारा बदलणे, किरकोळ दुरुस्ती यासाठी हा पुरवठा खंडित केला जात आहे. परतवाडा, अचलपूर या जुळ्या शहरांसह लगतच्या देवमाळी, कांडली, गौरखेडा कुंभी या ग्रामीण भागात ग्रामपंचायतींना विद्युत पुरवठा खंडित करण्यापूर्वी पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी संपर्क केला जात असल्याचे सांगण्यात आले. मात्र, सर्वसामान्य ग्राहक या सेवेपासून वंचित आहेत.
बॉक्स
वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर येतो संदेश
विद्युत पुरवठा खंडित होत असल्याची पूर्वसूचना ग्राहकाला मिळावी, यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले. त्यासाठी महावितरण कंपनीच्यावतीने ग्राहकांचा मोबाईल क्रमांक घेण्यात आला. त्यावर पूर्वसूचना देणारे मेसेज काही दिवस पंधरा मिनिटे किंवा अर्धा तास अगोदर यायचे. मात्र, मागील दोन महिन्यांपासून ही सेवासुद्धा पूर्णत: खंडित झाली. आदल्या दिवशी वीजपुरवठा खंडित झाला असताना, मेसेज दुसऱ्या दिवशी येत असल्याचा संतापजनक प्रकार वरातीमागून घोडे दामटण्यासारखाच आहे.
बॉक्स
ग्राहक सेवा केंद्राचा क्रमांक ‘रामभरोसे’
घरगुती, दुकानांचा वीजपुरवठा किंवा तो वाहून नेणाऱ्या तारा खंडित झाल्यास वा इतरही माहिती देण्यासाठी प्रसारित केलेला अचलपूर येथील ग्राहक सेवा केंद्राचा क्रमांक कायमचा बंद किंवा व्यस्त आढळून येतो. त्यामुळे ही सेवा सुद्धा कुचकामी ठरली आहे.
बॉक्स
अधिकाऱ्यांची टोलवाटोलवी
वीजपुरवठा खंडित झाल्यावर अभियंत्यांना यासंदर्भात संपर्क केल्यास कनिष्ठ अधिकारी कर्मचाऱ्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक देतात. त्यांना विचारणा केली, तर अर्ध्या तासात विद्युत पुरवठा सुरळीत होईल, असे सांगून वेळ मारून नेली जाते. हा प्रकारही नागरिकांमध्ये चीड निर्माण करणारा ठरला आहे