अमरावती : गेल्या काही दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरीचे एकमेव आमदार देवेंद्र भुयार आणि राजू शेट्टींमध्ये दुरावा आल्याच्या चर्चा सुरू होत्या. ते स्वाभिमानीशी अंतर ठेवून असल्याचेही म्हटले जात होते. तर,आता त्यांना पक्षातून नारळ मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेत राजू शेट्टी हे अमरावती दौऱ्यावर आहेत. अशावेळी या कारवाईसंदर्भात काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भुयार हे आमदार झाल्यापासून स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि चळवळीशी अंतर ठेवून असल्याची खदखद स्वाभिमानी शेतकरी संघटनेत आहे. मला विश्वासात घेतलं तर आपण सोबत असेल नाही घेतलं तर त्यांच्याशिवाय असा इशारा आमदार देवेंद्र भुयार यांनी दिला होता. तर, आता त्यांच्याच हकालपट्टीची शक्यता आहे.
विधानसभा २०१९ च्या निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे देवेंद्र भुयार एकमेव आमदार म्हणून निवडून आले. मात्र, त्यानंतर त्यांची पक्षातील सक्रियता कमी झाली असल्याचे बोलले जात आहे. ते कार्यकर्त्यांना सहकार्य करत नसतील, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलत नसतील तर ते आमदारही आम्हाला नको आहे, अशी भूमिका स्वाभिमानी विदर्भ समितीच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे. अमरावतीच्या हिवरखेड येथील राजू शेट्टीच्या सभेच्या बॅनरवरही भुयार यांचा फोटोही गायब आहे. अशावेळी, आज राजू शेट्टींच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.