अमरावती : ४०० लोकसंख्येच्या गावात पहिली ते पाचवीपर्यंतच्या जिल्हा परिषद शाळेत दोन शिक्षक तैनात असले तरी एकमेव विद्यार्थी असल्याचा प्रकार अमरावती जिल्ह्यातील मेळघाटच्या दुर्गम भागातील माडीझडप येथे पाहायला मिळत आहे. या गावातील मुले गेली कुठे, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
विदर्भाचे नंदनवन म्हणून सर्वदूर प्रसिद्ध असलेल्या चिखलदरा तालुक्यातील शेवटच्या टोकावरील माडीझडप हे आदिवासीबहुल गाव आहे. रोजगाराअभावी येथील आदिवासी कुटुंबीय स्थलांतर करीत असल्याचे वास्तव आहे. याचा फटका त्यांच्या मुलाबाळांना बसतो. माडीझडप येथील शाळा ही अमरावती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने आवागड या केंद्राशी जोडलेली आहे. इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत या शाळेत वर्ग असून, दोन शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यापैकी एक गावातच मुक्कामी राहतात, तर एक शिक्षक बाहेरगावहून ये-जा करतात
शाळा अन् विद्यार्थी वाचवामेळघाटात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये वीज नाही. पाणी नाही. पायाभूत सुविधा नाही. हळूहळू मेळघाटातून जिल्हा परिषदेच्या शाळा बंद होत आहेत. गत महिन्याभरापूर्वी माडीझडप शाळेत भेट दिली असता, पटावर एकच विद्यार्थिनी पहिल्या वर्गात असल्याचे दिसून आले.
पहिली ते पाचवीपर्यंत येथे वर्ग असून, दोन शिक्षक आहेत. राजकीय नेते, पालक, प्रशासन आणि समाजाने देशाचे भवितव्य सुरक्षित ठेवण्यासाठी शाळा, शिक्षक आणि विद्यार्थी वाचविण्यासाठी पुढे येणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया खोज संस्थेचे बंड्या साने यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
माडीझडप शाळेत पहिली ते पाचवीपर्यंत वर्ग आहे. काही दिवसांपूर्वी पालकांनी दोन विद्यार्थ्यांना आश्रमशाळेत पाठविले होते. मात्र, आता ते दोन विद्यार्थी परतले. सध्या तीन विद्यार्थी, दोन शिक्षक अशी या शाळेची रचना आहे. - रामेश्वर माळवे, खंडविकास अधिकारी, चिखलदरा