लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोनामुळे शाळा, महाविद्यालये बंद आहेत. परीक्षा, निकाल यांचे नियोजन नाही. मात्र, शालेय शिक्षण विभागाने इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग जूनअखेरीस सुरू करण्याचे नियोजन चालविले आहे. त्याअनुषंगाने प्रारूप आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती आहे.इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या ‘नो परीक्षा, नो निकाल’ असे चित्र आहे. कोरोना संकटात अडीच महिन्यांपासून शाळा बंद आहेत. नव्या वर्गात प्रवेशाची अनिश्चितता आहे. खासगी शाळांमध्ये शिक्षकांच्या वेतनाची बोंबाबोंब आहे. दहावी, बारावीचा निकाल कधी जाहीर होणार, हे तूर्तास निश्चित नाही. मात्र, शासनस्तरावर इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याबाबतची तयारी करण्यात येत आहे. गत आठवड्यात राज्याच्या शिक्षण संचालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांसोबत ऑनलाईन व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे येत्या काळातील शिक्षण व्यवस्थेबाबत मंथन केले आहे. यात इयत्ता आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू करण्यासंदर्भातील सूचना मिळाल्या आहेत. वर्ग सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना शिक्षण ऑनलाईन की ऑफलाईन, हे स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेण्यात येणार आहे. गावातील शिक्षक, स्वयंसेवकांकडून विद्यार्थ्यांच्या शिकवणीसाठीदेखील मदत घेतली जाणार आहे. येत्या काही दिवसांत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे निकालपत्र वाटप करण्यात येणार आहे.१५ जूनपर्यंत पुस्तकांचे वाटपजिल्हा परिषद, महापालिका, नगरपरिषद या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळांमधील पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना १५ जूनपर्यंत पुस्तकांचे वाटप केले जाणार आहे. त्यानुसार शिक्षण विभागाने तयारी केली आहे. शाळेत विद्यार्थी, पालकांना बोलावून त्यांना पुस्तके वितरित करण्यात येतील. विद्यार्थ्यांच्या हाती पुस्तक मिळाल्यानंतर ते किमान हाताळून अभ्यासाला सुरुवात करतील, अशी अपेक्षा शिक्षण विभागाने व्यक्त केली आहे.जूनअखेर पहिल्या टप्प्यात ८ ते १२ वीचे वर्ग सुरू होतील, अशी तयारी आहे. त्याकरिता शासन निर्णय जारी होणार आहे. ऑनलाईन किंवा ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारचे शिक्षण देण्याचे नियोजन आहे.- प्रिया देशमुख, शिक्षणाधिकारी, (प्राथमिक) अमरावती.
जूनअखेर आठवी ते बारावीचे वर्ग सुरू होणार! शासननिर्णयाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 11:37 AM