अमरावती - देशातील ४,०४१ नागरी स्थानिक स्वराज्य संस्था जानेवारी २०१८ मध्ये स्वच्छ सर्वेक्षण २०१८ ला सामोरे जात आहेत. चार हजार गुणांच्या या परीक्षेत अव्वल ठरण्यासाठी पूर्वतयारीने वेग घेतला असून, शहराशहरांमध्ये स्वच्छतेच्या मुद्द्यावर अहमहमिका लागली आहे.४ जानेवारी ते ४ फेब्रुवारी २०१८ या कालावधीत देशभरातील ४,०४१ शहरांमध्ये स्वच्छ सर्वेक्षण होऊ घातले आहे. केंद्राच्या गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालयाच्या अखत्यारीतील कौन्सील आॅफ इंडियाचे पथक शहराशहरांत जाऊन स्वच्छतेचे सर्वेक्षण करणार आहे.
स्वच्छताविषयक ७१ बाबींवर हे स्वच्छ सर्वेक्षण होणार असून, राज्य आणि विभागीय स्तरावर शहरांचे नामांकन केले जाईल. २०१८ मध्ये होणारे हे तिसरे स्वच्छ सर्वेक्षण आहे. यापूर्वी २०१७ मध्ये झालेल्या स्वच्छ सर्वेक्षणात ४३४ शहरांनी सहभाग घेतला. ही परीक्षा दोन हजार गुणांची होती. त्यापूर्वी २०१६ मध्ये अवघ्या ७३ शहरांनी स्वच्छ सर्वेक्षणात सहभाग नोंदविला होता. शहरे स्वच्छ व हागणदरीमुक्त करून नागरी वस्त्या सुजलाम् सुफलाम् करण्यासाठी स्वच्छ सर्वेक्षण हाती घेण्यात आले आहे. स्वच्छतेच्या माध्यमातून गरिबी आणि आरोग्याच्या प्रश्न समस्येवर मात करण्यासाठी केंद्राने हा महत्त्वाकांक्षी प्रयोग हाती घेतला आहे.
देशातील प्रत्येक नागरिकाला स्वच्छतागृह पुरविण्यासह घनकचरा व्यवस्थापन, विलगीकरण, प्रक्रिया आणि कचरा संकलन हे घटक स्वच्छ सर्वेक्षणात अंतर्भूत आहेत. शहरातील स्वच्छतेविषयक पाहणी करण्यासाठी क्यूसीआय ही त्रयस्थ यंत्रणा येणार असून स्वच्छ सर्वेक्षणातील गुणांकनावर केंद्र शासन व राज्य शासनाचे अनुदान ठरणार आहे. संपूर्ण शहर हागणदरीमुक्त करून घनकचरा व्यवस्थापन प्रभावीपणे राबविणाºया शहरांना पुरस्कारार्थ प्रोत्साहन निधी देऊन गौरविण्यात येईल. त्यादृष्टीने महापालिका, नगरपालिका व नगरपंचायत प्रशासन कामाला लागले आहेत.
वैयक्तिक शौचालयासह सार्वजनिक, सामुदायिक स्वच्छतागृहांची उभारणी, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, घनकचरा विलगीकरण आणि स्वच्छतेसाठी अॅप कार्यान्वित करण्यासोबतच स्वच्छतेविषयक मोहीम, अभियान व जनजागृती हाती घेण्यात आली आहे. विशेष म्हणजे, अमरावती महापालिकेने सर्वेक्षण २०१८ साठी ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून अभिनेते भारत गणेशपुरे यांची निवड करून पूर्वतयारीला वेग दिला आहे.
नागरिकांच्या प्रतिक्रिया १४०० गुणांच्याजानेवारी-फेब्रुवारी २०१८ मध्ये होऊ घातलेल्या चार हजार गुणांच्या स्वच्छ सर्वेक्षणात नागरिकांच्या प्रतिक्रिया अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. नागरी स्थानिक संस्थांनी स्वच्छतेविषयक कसे कामकाज केले, त्याबाबतच्या प्रतिक्रियांवर १,४०० गुण अवलंबून आहेत. याशिवाय प्रत्यक्ष निरीक्षणाला १२०० गुण, तर स्वच्छतेविषयक सेवास्तरावरील प्रगतीसाठी १,४०० गुण आहेत.
जानेवारी २०१८ मध्ये तिसरे स्वच्छ सर्वेक्षण होऊ घातले आहे. या चार हजार गुणांच्या परीक्षेत अव्वल ठरण्यासाठी महापालिकेने पूर्वतयारीला वेग दिला आहे.- हेमंतकुमार पवार, आयुक्त, महापालिका, अमरावती