संदीप मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: राज्य मार्ग परिवहन विभागाच्यावतीने जिल्ह्यासाठी ४० नवीन शिवशाही बस काही महिन्यापूर्वी दाखल झाल्या. नवीन व तेवढ्याच आरामदायक असलेल्या शिवशाहीचा प्रवास प्रवाशांना आवडल्यामुळे या बसचे सर्वांनी स्वागतही केले. मात्र, आता याच कोट्यावधी रुपये खर्च करून आणण्यात आलेल्या शिवशाहीचे मेंटनन्स ठेवण्यात एसटी महामंडळ अपयशी ठरत आहेत. आतून शिवशाही स्वच्छ, तर बाहेरून अस्वच्छतेचा कहर अशी परिस्थिती आता शिवशाही बसची झाली आहे.जिल्ह्यात ४० नवीन शिवशाही, बस तर चार बस खासगी कंपनीच्या दाखल झाल्या आहेत. त्या बस लांब पल्ल्याच्या प्रवासात व मेट्रोसिटीत पाठविणे अपेक्षित असताना काही बसचे तालुका पातळीवरसुद्धा शेड्यूल लावण्यात आले आहे. आतमध्ये एसी व आरमदायक आसान व्यवस्था असलेल्या शिवशाही बस जरी आतून स्वच्छ असली तरी नियमित स्वच्छता करण्यात येत नसल्याने बाहेरून घाण दिसते. बसला बाहेरून वॉश केले जात नसल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. इतर बसच्या तुलनेत शिवशाहीचे प्रवास भाडे हे दर ५० किमीला २८ रुपयांनी जास्त आहेत. तरीही या बसचा प्रवास सुखकारक असल्यामुळे अनेक सुशिक्षित व नोकरदार नागरिक या बसला पसंती देतात. सामान्य बसपेक्षा तिकीट दर जास्त असल्याने शिवशाहीचा प्रवास नको रे बाबा असे म्हणत सामान्य व ग्रामीण भागातील प्रवासी इतर बसने प्रवास करतात. लोेकांचे आरोग्य चांगले राहण्याचे दृष्टिकोणातून शिवशाहीची नियमित स्वच्छ करणे अनिवार्य आहे.देखभाल कुणाकडे... : अमरावती मध्यवर्ती आगाराचे स्वतंत्र वर्कशॉप आहे. पण, अत्याधुनिक व डिजिटल शिवशाहीसाठी स्वतंत्र वर्कशॉप संरचना येथे नाही. किरकोळ अडचणी स्थानिक पातळीवर दुरुस्त होत असल्याचे एसटीने स्पष्ट केले, तर मोठा बिघाड झाल्यास मुंबईलाच पाठविण्यात येत असल्याची माहिती आहे. त्यामुळे अस्वच्छ होत असलेल्या शिवशाहीचे मेंटनन्स कुणाकडे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यामुळे जर त्याचे मेंटनन्स अमरावतीत होत नसेल, तर याकडे दुर्लक्ष होणारच, अशी प्रतिक्रिया अनेक जागरूक प्रवाशांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली आहे.शिवशाही बसच्या स्वच्छतेचे कंत्राट किस्ट्रल कंपनीला देण्यात आले आहे. हीच कंपनी नियमित बसची स्वच्छता करते. काही छोट्या-मोठ्या अडचणी आल्यास, त्या अमरावती येथील वर्कशॉपमध्ये दुरुस्ती करण्यात येते.- श्रीकांत गभणेविभाग नियंत्रक, अमरावती.
आतून स्वच्छ, बाहेरून अस्वच्छ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 10:42 PM
राज्य मार्ग परिवहन विभागाच्यावतीने जिल्ह्यासाठी ४० नवीन शिवशाही बस काही महिन्यापूर्वी दाखल झाल्या. नवीन व तेवढ्याच आरामदायक असलेल्या शिवशाहीचा प्रवास प्रवाशांना आवडल्यामुळे या बसचे सर्वांनी स्वागतही केले.
ठळक मुद्देशिवशाही : एसटी महामंडळाचे दुर्लक्ष