नगरसेविकेच्या पत्राची मुख्यधिकाऱ्यांनी घेतली दखल
अंजनगाव सुर्जी : शहराच्या सफाईच्या आघाडीवर कार्यरत कंत्राटी सफाई कामदारांना अखेर नगर परिषदेने संरक्षक किट पुरविली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांना संरक्षण पुरविण्याची मागणी नगरसेविका सुनीता मुरकुटे यांनी मुख्याधिकारी सुमेध अलोणे यांच्याकडे केली होती. त्याची दखल घेत दुसऱ्याच दिवशी कामगारांना किटचे वाटप झाले.
कंत्राटी सफाई कामगारांना कंत्राटदाराकडून गेल्या एक वर्षापासून तोंडाला मास्क तर नव्हेच, हातमोजे, बूट, सॅनिटायझर व इतरही कोणतेही संरक्षण साहित्य उपलब्ध करण्यात आले नव्हते. त्यामुळे सफाई कामगारांचे आरोग्य धोक्यात आले होते. याबाबत मुख्याधिकाऱ्यांना वेळोवेळी अवगत केले. परंतु, काही एक उपयोग झाला नाही. त्याबाबत नगरसेवकांना जनतेकडून व सफाई कर्मचाऱ्यांकडून टोमणे मारले जात होते. या गंभीर बाबीकडे नगरसेविका सुनीता मुरकुटे यांनी त्वरित दखल घेऊन कंत्राटी सफाई कामगारांना येत्या दोन दिवसांत संरक्षक किट उपलब्ध करून देण्याचे लेखी पत्राद्वारे सूचित केले होते. याविषयात मुख्यधिकाऱ्यांच्या दालनात आंदोलन करण्याची भूमिका त्यांनी घेतली होती. मुख्याधिकारी सुमेध अलोने यांनी पत्राची त्वरित दखल घेऊन दुसऱ्याच दिवशी कंत्राटदारामार्फत सफाई कामगारांना संरक्षक किट उपलब्ध करून दिली.