बडनेरा शहराची स्थिती : नगरसेवकांसह महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष बडनेरा : महापालिका प्रशासन, नगरसेवकांसह, सफाई कंत्राटदारांचे महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत बडनेरा शहराच्या स्वच्छतेकडे पूर्णत: दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे. ठिकठिकाणी घाण साचली आहे. बहुतांश नगरसेवक व सफाई कंत्राटदार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. बडनेरा शहराची लोकसंख्या एक लाखाच्या घरात आहे. एक महिन्यापासून शहरात ठिकठिकाणी घाण साचून असल्याचे दृश्य आहे. नव्यावस्तीसह जुनीवस्ती परिसरात स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. विद्यमान नगरसेवकांसह साफसफाई कंत्राटदारदेखील महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. काहींनी तर आपल्याला पक्षांची उमेदवारी मिळो अथवा न मिळो निवडणूक लढण्याचे ठाणून घेतले आहे. हे सर्वजन निवडणुकीच्या प्रचारात उमेदवारी मिळविण्याच्या कामात गुंतले आहेत. शहराच्या स्वच्छतेकडे यामुळेच दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात आहे. शहरातील अस्वच्छतेमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. स्वच्छतेकडे लक्ष द्यावे, असे नागरिकांमध्ये बोलले जात आहे. एकाच ठिकाणी साचून असणारा केरकचरा बऱ्याच दिवसांपर्यंत तसाच पडून राहत आहे. महानगरपालिका प्रशासनदेखील याबाबत गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. महापालिका आयुक्तांनीच याकडे लक्ष घालावे, अशी बडनेरवासियांची अपेक्षा आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त शहरात थातूर-मातूर स्वच्छता करण्यात आल्याचे दिसून आले. पुढे महापालिका निवडणुका पार पाडण्यासाठी एक महिन्याचा अवधी शिल्लक आहे. निवडणुकीच्या रणधुकाळीत शहराच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष होऊ नये, असे बोलल्या जात आहे. (शहर प्रतिनिधी)नागरिकांच्या समस्यांना जबाबदार कोण ?गेल्या १५ दिवसांपूर्वी जीवन प्राधिकरण विभागाकडून पाणीपुरवठ्याची देयके नागरिकांना चौपट दराने प्राप्त झाली आहेत. ५० हजार रुपयांपर्यंतची बिले देण्यात आली आहेत. 'लोकमत'ने यापूर्वीदेखील यासंदर्भात वृत्त प्रकाशित केले होते. इच्छुक उमेदवारांना आमच्या समस्येकडे लक्ष देण्यासाठी आता वेळ नसल्याचे दिसून येत आहे. यावर मात्र नागरिक नाराजी व्यक्त करीत आहे.
निवडणूक रणधुमाळीत स्वच्छतेचा बोजवारा
By admin | Published: February 01, 2017 12:07 AM