प्रशासनाचा पुढाकार : इंदूरच्या धर्तीवर स्वच्छता अभियान लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महापालिकेच्या आस्थापनेवर असलेल्या स्वच्छता कामगारांची हजेरी यापुढे बायोमेट्रिक पद्धतीने नोंदविली जाणार आहे. स्वच्छता कामगारांत शिस्त आणि कामाप्रति सजगता वाढविण्यासाठी इंदूरच्या धर्तीवर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आयुक्त हेमंत पवार यांनी संयुक्त पत्रपरिषदेत दिली. प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांनी केलेल्या इंदूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शनिवारी ही पत्रपरिषद घेण्यात आली. यावेळी महापौर संजय नरवणे, उपमहापौर संध्या टिकले, स्थायी समिती सभापती तुषार भारतीय, सभागृह नेते सुनील काळे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. स्वच्छ सर्वेक्षणात महापालिकेला २३१ वा क्रमांक मिळाला. ही खेदजनक बाब असून आता पहिल्या १०० स्वच्छ शहरांमध्ये महापालिका यावी, यासाठी प्रशासन आणि पदाधिकारी हातात हात घालून काम करतील, असा विश्वास आयुक्तांसह महापौरांनी व्यक्त केला. महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, आयुक्त, उपायुक्त नरेंद्र वानखडे आणि वैद्यकीय आरोग्य अधिकारी सीमा नैताम यांनी नुकताच इंदूर दौरा केला. स्वच्छतेच्या बाबतीत देशभरातील ५०० शहरांमधून पहिला क्रमांक पटकाविणाऱ्या इंदूर शहराची पाहणी करून आल्यानंतर त्या धर्तीवर शहरात काय करता येईल, यासाठी पत्रपरिषदेचे आयोजन करण्यात आले. इंदूर महापालिकेत स्वच्छता कामगारांची हजेरी बायोमेट्रिक पद्धतीने घेतली जाते. ती पद्धत महापालिकेत अवलंबविणे शक्य असल्याचे मत आयुक्तांनी मांडले. स्वच्छ अमरावतीसाठी विरोधीपक्षासह सर्व राजकीय पक्ष, स्वयंसेवी संस्था व्यापारी व सर्व घटकांचे सहकार्य अपेक्षित आहे. लोक सहभागाशिवाय स्वच्छतेची वाटचाल अशक्य असल्याने सर्वांचेच सकारात्मक सहकार्य घेतले जाईल, असे तुषार भारतीय यांनी सांगितले. स्वच्छतेसाठी कठोर निर्णय घेण्यास मागेपुढे पाहिले जाणार नाही, असा इशारा महापौर संजय नरवणे यांनी दिला. स्वच्छतेत पहिला क्रमांक मिळविण्यासाठी इंदूरने संपूर्ण शहर कंटेनरमुक्त केले. युझर चार्जेस लावत दैनंदिन कचरा संकलन ,बायोमेट्रिक हजेरी, प्रचंड समन्वय, स्वच्छतेबाबत व्यापक जनजागृती, प्रत्येक घर आणि आस्थापनात डस्टबिन, प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांची दूरदृष्टी आणि घनकचरा व्यवस्थापनामुळे इंदूर पहिला क्रमांक पटकाविण्यात यशस्वी ठरल्याचे निरीक्षण महापौरांसह पदाधिकारी आणि आयुक्तांनी नोंदविले.शहर स्वच्छतेसाठी घनकचऱ्याचे विलगीकरण व व्यवस्थापन प्रकल्पावर भर दिला जाणार आहे. प्रत्येकाने घरी आणि आस्थापनेत २ डस्टबिन ठेवाव्यात, असे आवाहन आयुक्तांनी केले. स्वच्छता कामगारांमध्ये शिस्त लावण्यासाठी त्यांचीे बायोमेट्रिक हजेरी आधार लिंक केली जाईल.
स्वच्छता कामगारांची हजेरी ‘बायोमेट्रिक’च्या कक्षेत
By admin | Published: June 18, 2017 12:03 AM