अमरावती जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या ग्रामसभांना १५ जानेवारी २०२१ च्या परिपत्रकानुसार स्थगिती देण्यात आली होती. मात्र, ही स्थगिती ग्रामविकास विभागाने ११ फेब्रुवारी रोजीच्या पत्रानुसार स्थगिती उठविली आहे. यामुळे जिल्हाभरातील ८४० ग्रामपंचायतींना ग्रामसभा घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र दुसरीकडे सध्या जिल्हाभरात कोरोना संक्रमित रूग्णाची वाढती संख्या लक्षात घेता सभा,मेळाव व अन्य कार्यक्रमाना जिल्हाधिकारी यांनी निर्बंध घातले आहेत. त्यामुळे ग्रामसभा घेण्याचा पेच सध्या तरी निर्माण झाला आहे.
राज्याच्या ग्रामविकास विभागाने १५ जानेवारीच्या जारी केलेल्या परिपत्रकानुसार ग्रामपंचायतीच्या ग्रामसभा ३१ मार्चपर्यंत स्थगिती दिली होती. मात्र ग्रामविकास विभागाने ही स्थगिती उठविली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत ग्रामसभा घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या पत्रानुसार जिल्ह्यात ग्रामसभा घेताना ग्रामपंचायतीने सोशल फिजिकल डिस्टंसिंग,कोविड १९ च्या अनुषंगाने निर्गमित मार्गदर्शक तत्वांचे काटेकोर पालन करावे. तसेच पूर्वीप्रमाणे ग्रामसभांचे आयोजन करण्यास परवानगी देण्यात येत असल्याचे ग्रामविकास विभागाने काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे. ग्रामसभेच्या मंजुरी अभावी वार्षिक आराखडे शासनाच्या विविध योजना अंतर्गत वैयक्तिक लाभार्थी यादी, पुनर्वसित गावांचे प्रस्ताव, गौण खनिज परवानगी, थेट सरपंच विरोधातील अविश्वास ठराव चौदाव्या व पंधराव्या वित्त आयोगाचा निधी खर्च या बाबी प्रलंबित राहिल्या आहेत तसेच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव देखील कमी होत चालला असल्याने जनजीवन पूर्ववत होत असल्याने शासन ग्रामसभेत स्थगिती उठविली असल्याचे या पत्रात म्हटले आहे. एकिकडे स्थगिती उठविली असल्याने सर्व ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभा घेण्याची लगीनघाई सुरू झाली असून ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी यांनी ग्रामसभेची तारीख काढण्याचे नियोजनाच्या हालचाली सुरू असतांनाच जिल्ह्यात सध्या कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता जिल्हाधिकारी यांनी वाढता संसर्गाला प्रतिबंध घालण्यासाठी सभा,मेळावे आदींना मनाई आदेश जारी केला आहे.त्यामुळे ग्रामविकास विभागाने ग्रामसभा घेण्यास परवानगी दिली असला तरी जिल्ह्यात मात्र या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी पेच निर्माण झाला आहे.
बॉक्स
सभा, मेळाव्यावर निर्बंध शिथिल झाल्यानंतर निर्णय
१५ जानेवारी रोजी ग्रामविकास विभागाने ग्रामसभांना ३१ मार्च पर्यत स्थगिती देण्याबाबतचे निर्देश दिले होते.अशातच ११ फेब्रुवारी रोजी स्थगीत घटवून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करून सभा घेण्याचे सूचविले आहे.मात्र सध्या जिल्ह्यात कोरोनाचा प्रक्रोप वाढत असल्याने मेळावे, सभाना मनाई केली आहे.याबाबत नियम शिथिल झाल्यानंतर ग्रामविकास विभागाच्या आदेशाची अंमलबजावणी केली जाणार जाणार असल्याचे जिल्हा परिषद पंचायत विभागाचे डेप्युटी सीईओ दिलीप मानकर यांनी सांगितले.