अमरावती: प्राध्यापिकेची नोकरी लावून देण्याच्या आर्थिक व्यवहारातून शिक्षण विभागात कार्यरत लिपिकाला ओलीस ठेवून त्याच्याकडून रक्कम लुटण्याच्या प्रकरणातील फरार आरोपीला अटक करण्यात आली आहे. कुंदन शिरकरे (वय २२ वर्ष रा. यशोदा नगर) असे अटक आरोपीचे नाव असून, तो तडीपार देखील आहे. त्याला २३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी अटक करण्यात आली. गुन्हे शाखा युनिट दोनने ही कारवाई केली. त्याला फ्रेजरपुरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
शिरकरे याच्या अटकेने फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या दरोडा व अपहरणाच्या प्रकरणातील अटक आरोपींची संख्या तीन अशी झाली आहे. यापुर्वी या प्रकरणात अतुल पुरी व बबलू गाडे यांना अटक करण्यात आली आहे. तर प्रकरणाचा मास्टरमाईंड अद्यापही फ्रेजरपुरा पोलीसांच्या हाती लागलेला नाही. दरम्यान, शुक्रवारी अटक करण्यात आलेला कुंदन शिरकरे हा बबलू गाडे टोळीचा सदस्य असल्याची माहिती गुन्हे शाखेने दिली. बबलु गाडे टोळीमध्ये काम करणारा कुख्यात व तडीपार असलेला फरार आरोपी कुंदन शिरकरे हा ऑक्सिजन पार्क येथे हातात शस्त्र घेऊन धुमधाम करीत असल्याची माहिती गुन्हे शाखेला २३ रोजी मिळाली होती. त्यानुसार, सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे एक लोखंडी खंजर मिळून आला. आरोपी कुंदन हा तडिपार असतांना देखील सशस्त्र आढळून आल्याने त्याच्याविरूध्द तडीपार आदेशाचे उल्लघंन व शस्त्र अधिनियमाअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. अटक आरोपींना रविवारी महादेवखोरीत ज्या घरात जाधव यांना ओलीस ठेवण्यात आले होते, तेथे देखील ‘बायरोड’ नेण्यात आले.
पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी, उपायुक्त (गुन्हे) कल्पना बारावकर, उपायुक्त सागर पाटील, सहायक पोलीस आयुक्त शिवाजीराव बचाटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोनच्या प्रमुख सिमा दाताळकर, सहायक निरिक्षक महेश इंगोले, यांच्या पथकाने ही कारवाई केली.
प्रशांत राठी नॉट रिचेबल
लिपिक पुंडलिक जाधव यांच्या तक्रारीवरून फ्रेजरपुरा पोलिसांनी १६ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल केला होता. मात्र, ज्याच्या इशाऱ्यावर जाधव यांचे अपहरण करण्यात आले, तो मास्टरमाईंड प्रशांत राठी एफआयआरच्या नऊ दिवसानंतरही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. तो नॉट रिचेबल झाला आहे. फ्रेजरपुरा पोलिसांना अद्यापही त्याचे लोकेशन मिळालेले नाही. तर, दुसरीकडे ज्या शिक्षण संस्थेत प्राध्यापिकेची नौकरी लावून देण्यासाठी प्रशांत राठीने महल्ले नामक इसमाकडून १५ लाख रुपये घेतलेत, ती शिक्षणसंस्थेभोवती चौकशीचा फास आवळला गेला आहे.