अमरावती : सायबर भामट्याने पाठविलेल्या लिंकवर क्लिक करताबरोबर एकाच्या खात्यातून तब्बल २ लाख ९९ हजार ९९७ रुपये परस्पर डेबिट झाले. २६ फेब्रुवारी रोेजी सकाळी १०.३५ ते १०.४२ या अवघ्या सात मिनिटांच्या कालावधीत तो सायबर फ्रॉड झाला. श्रीकृष्णपेठ येथील अजय बिहारीलाल अग्रवाल (५९) यांनी त्याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी २७ फेब्रुवारी रोजी दुपारी अज्ञात आरोपीविरूद्ध फसवणूक व आयटी ॲक्टअन्वये गुन्हा दाखल केला.
एका अज्ञात आरोपीने अग्रवाल यांना कॉल करून आपण एचडीएफसी बॅंकेतून बोलत असल्याची बतावणी केली. बॅंकखात्याला पॅनकार्ड जोडण्याची व केवायसी करण्याची आजची शेवटची तारिख असून तसे न केल्यास आपल्याला बॅकेचे व्यवहार करण्यास अडचण निर्माण होईल, अशी भीती दाखविली. केवायसी व पॅनकार्डची संलग्नता अत्यंत सोपी बाब असून, त्यासाठी केवळ बॅंकेने पाठविलेल्या लिंकवर क्लिक करण्याची सुचना करण्यात आली. पलिकडून लुल्ला यांच्या मोबाईलवर एक लिंक पाठविण्यात आली. त्या लिंकवर क्लिक करताच त्यांच्या खात्यातून समोरच्या क्षणाला २.९९ लाख रुपये ऑनलाईनच डेबिट झाले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच लुल्ला यांनी सायबर पोलीस ठाणे गाठले.
काय म्हणतात तज्ञ
हॅकर्सकडून नवनवीन फंडे वापरून ऑनलाईन व्यवहार करणाऱ्यांना गंडा घालण्याचे काम सुरूच असते.आता तर, हॅकर्सने एचडीएफसी बँकेची बनावट लिंक तयार केली आहे. ही लिंक ओरिजनल लिंकची साधर्म्य असल्याने, ग्राहकांचीही फसगत होते. या हॅकर्सकडून ही लिंक व्हायरल करण्यात आलेली आहे.
एका नामांकित बॅंकेतून बोलत असल्याची बतावणी करून लिंक पाठविली जाते. ती ओपन करून त्यावर असलेली माहिती भरताच, क्षणार्धात खाते रिकामे होते. अशारितीने हॅकर्स अनेकांना गंडा घातला आहेत. ऑनलाईन आर्थिक व्यवहार करताना बँकेच्याच संकेतस्थळावर वा ॲपवर जाऊन व्यवहार करावे.
- सीमा दाताळकर, पोलीस निरिक्षक, सायबर पोलीस ठाणे