अमरावती: शहरासह जिल्ह्यात निर्माण झालेले ढगाळ वातावरण, मध्येच पडत असलेला पाऊस अशा स्थितीत जुळवून घेणे नागरिकांना अडचणीचे ठरत आहे. ऋतूमान बदलाचा मानवी आरोग्यावर तात्काळ परिणाम होतो. त्यामुळे सध्या सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी अशा प्रकारच्या व्याधींनी नागरिक त्रस्त झाले आहेत. अशा बदलत्या वातावरणात आरोग्याची पुरेशी दक्षता हाच रामबाण उपाय ठरू शकतो, असे मत झेडपीच्या आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
अचानक निर्माण झालेल्या ढगाळ वातावरण उष्मा, पाऊस, थंडी असे वातावरण आरोग्यास अपायकारक ठरू शकणारे आहे. अशा वातावरणात व्हायरल इन्फेक्शनची शक्यता वाढते. वातावरणातील बदलामुळे प्रामुख्याने सर्दी, खोकला, अंगदुखी, ताप, अस्थमा बळावण्याने संसर्गजन्य आजारामुळे रुग्णसंख्याही वाढू शकते. या बदलांशी जुळवून घेण्यासाठी शरीराला काही वेळ लागतो. या समस्येत डासांचीदेखील भर पडू शकते. त्यामुळे डासांची उत्पत्ती स्थळे तत्काळ नष्ट करण्याचे आरोग्याच्या समस्यांना दूर ठेवून पुरेशी काळजी घेण्याचा सल्ला आरोग्य विभागाने दिला. ते सर्दी, खोकला, घशाचे विकार, ताप डोकेदुखी, उलट्या जुलाब यासारखे आजार झाल्यास तत्काळ डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घेणे फायदेशीर ठरू शकते. नागरिक घरगुती उपाय करण्यावर भर देतात मात्र अशा वेळी कुठलेही घरगुती उपचार घेणे चुकीचे ठरू शकते. आजारी असताना तोंडाला रुमाल बांधावा, लहान मुले ज्येष्ठ नागरिक गर्भवती महिला यांच्यावर बदलत्या वातावरणाचा परिणाम होतो. त्यामुळे काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
कोट
वातावरणातील बदलामुळे विषाणूचा संसर्ग वाढतोय. ॲलर्जीच्या आजाराचे प्रमाण बळावते. त्यामुळे आरोग्याची योग्य खबरदारी घेणे आवश्यक आहे. परिपक्व आहार वेळी महत्त्वाचा आहे. आरोग्याच्या तक्रारी असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्यावीत
- रेवती साबळे,
अतिरक्त जिल्हा आरोग्य अधिकारी