लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदाच्या पावसाळ्यात ४५ दिवसांत ४२ टक्के पावसाची तूट आल्याने भर पावसाळ्यात पाणीटंचाईची दाहकता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईच्या उपाययोजनांना शासनाने दिलेली मुदतवाढ १५ जुलै रोजी संपुष्टात येत आहे. जुलै महिन्यात पाऊस सरासरीही गाठणार नाही, असे हवामान विभागाने स्पष्ट केल्याने जिल्ह्यात पावसाअभावी पाणी पेटणार असल्याचे वास्तव आहे.गतवर्षी सरासरीपेक्षा कमी पावसाने जिल्ह्याची भूजलपातळी झपाट्याने खालावली. त्यामुळे जलस्त्रोत उघडे पडलेत व प्रकल्पांना कोरड लागली. परिणामी जिल्ह्यातील ३०० वर गावे सध्याही तहानले आहेत. यंदाही पावसाचे १२० पैकी ४५ दिवस झाले असतानाही पावसात ४२ टक्क्यांची तूट आहे. त्यामुळे विहिरींची पाणी पातळी वाढलेली नाही. शासन निर्णयाप्रमाणे पाणीटंचाईच्या उपाययोजना ३० जुनला बंद केल्या जातात. यंदा जून अखेरपर्यंत पावसाचा पत्ता नसल्यामुळे शासनाने पाणीटंचाईच्या उपाययोजनांना १५ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली. या कालावधीत पाच गावांचे प्रस्ताव पाठविण्यात आलेत. त्याचप्रमाणे तात्पुरत्या पूरक पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आलेत. त्याचप्रमाणे तहानलेल्या ३०० वर गावांसाठी ५४ टँकर व ३५४ अधिग्रहणातील खासगी विहिरींनादेखील मुदतवाढ मिळाली. मात्र, १५ जुलैची मुदतवाढ संपत असतानादेखील पाऊस सरासरीत माघारल्याने पाणीटंचाईची दाहकता वाढलेली आहे. त्यामुळे शासनाने पाणीपुरवठ्याच्या उपाययोजनांना मुदतवाढ द्यावी, अशी मागणी होत आहे.सद्यस्थितीत १० तालुक्यातील ५३ गावांत जिल्हा प्रशासनाद्वारा टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये अमरावती तालुक्यात बोडना, डिगरगव्हान व परसोडा, तिवसा तालुक्यात ठाणाठुणी, वरखेड, तारखेड, गुरुदेवनगर, माळेगाव, दिवानखेड, मोर्शी तालुक्यात वाघोली, लेहगाव, आखतवाडा, पिंपळखुटा, दहसूर, आसोना, गोराळा, सावरखेड, शिरखेड, अंबाडा, वरूड तालुक्यात शहापूर, चांदूर रेल्वे तालुक्यात सालोरा खूर्द, आमला विश्वेश्वर, जळका, कारला, निमला, सावंगी मग्रापूर, अमदोरी, अंजनवती, अचलपूर तालुक्यात पथ्रोट, जनुना, चांदूरबाजार तालुक्यात घाटलाडकी, चिखलदरा तालुक्यात मनभंग, आडनदी, भिलखेडा, कोयलारी, पाचडोंगरी, धरमडोह, बहाद्दरपूर, पिंपादरी, मलकापूरम कोरडा, तारूबांडा, खडीमल, कुलगंना, गौरखेडा, लवादा, पस्तलाई, आलाडोह, खोगदा, आकी, नागापूर, चौऱ्याकूंड व राणीगाव येथे टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे.तहानलेल्या गावांची मुदतवाढीची मागणीसद्यस्थितीत खासगी अधिग्रहणातील ३५४ विहिरींद्वारे २९१ गावांची तहान भागविली जात आहे. यामध्ये अमरावती तालुक्यातील ३३ गावांत ४५, नादंगाव खंडेश्वर तालुक्यात ३० गावांत ३२, भातकुली, तिवसा २० गावांत २५, मोर्शी ३८ गावांत ५९, वरूड ३० गावांत ३४, चांदूर रेल्वे ४४ गावांत ५४, धामणगाव रेल्वे ११ गावांत १२, अचलपूर २१ गावांत ३७, चांदूरबाजार ४ गावांत ८, अंजनगाव सुर्जी ५ गावांत ७, दर्यापूर निरंक, चिखलदरा ४० गावांत ३५ तर धारणी तालुक्यात १४ गावांची अधिग्रहणातील १५ खासगी विहिरीद्वारे तहान भागविली जात आहे. यासह ५४ टँकरलादेखील मुदतवाढ द्यावी, अशी तहानलेल्या गावांची मागणी आहे.
पाणीटंचाईच्या तात्पुरत्या उपाययोजना आजपासून बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 1:38 AM
यंदाच्या पावसाळ्यात ४५ दिवसांत ४२ टक्के पावसाची तूट आल्याने भर पावसाळ्यात पाणीटंचाईची दाहकता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईच्या उपाययोजनांना शासनाने दिलेली मुदतवाढ १५ जुलै रोजी संपुष्टात येत आहे.
ठळक मुद्देमुदतवाढ संपली : पावसाच्या तुटीमुळे पाणीटंचाईची दाहकता वाढणार