अमरावती: खत्री कॉम्प्लेक्समधील एका रेडिमेड कापडाच्या दुकानाला अचानक आग लागल्याने दुकानाच्या दुसऱ्या माळ्यावरील लाखो रुपयांचे कपडे व साहित्य जळाले. घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे दोन बंब दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला.
सदर सपना नामक कापड्याचे दुकान बंद होते. दुसऱ्या माळ्यावरून धूर निघत असल्याने दुकान मालक घटनास्थळावर दाखल झाले. त्यांनी ही माहिती महापालिकेच्या अग्निशमन विभागाला दिली. अग्निशमन विभागाचे अधीक्षक अजय पंदरे व त्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत लाखो रुपयांचे कापड जळून खाक झाले होते. सदर आग शार्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. सिटी कोतवाली पोलीसही घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र वृत्त लिहिस्तोवर तक्रार न झाल्याने गुन्हा नोंदविण्यात आला नाही. पुढील तपास पोलीस करीत आहेत.