मनोहर सुने
अमरावती : चांदूर बाजार तालुक्यातील शिरजगाव कसबा येथे मान्सूनच्या पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या गावकऱ्यांना आश्चर्याचा धक्का दिला. २५ मिनिटे ढगफुटीसारखा मान्सून धो-धो बरसला. गावातील सखल भागातील रस्त्यांनी पाण्याच्या प्रवाहाने दुचाकी वाहत गेल्या.
मान्सूनच्या पावसाने जोरदार सुरुवात करून गावातील नागरिकांची तारांबळ उडविली. शनिवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. तो २५ मिनिटे मुसळधार कोसळला. त्यामुळे गावातील मुख्य मार्गावरून पावसाचे पाणी एखाद्या नदीप्रमाणे वाहत होते. गावातील रस्त्याच्या कडेला असणाऱ्या दुचाकी वाहने पाण्याच्या प्रवाहात वाहून जाताना पाहण्याची पहिल्यांदाच गावाला अनुभूती आली. या पावसाच्या अतिवृष्टीमुळे भारतीय स्टेट बँकेसमोर ग्राहकांच्या तसेच बँक कर्मचाऱ्यांच्या दुचाकी अक्षरश: पाण्याच्या वेगवान लाटेमध्ये वाहून जात होत्या. नागरिकांच्या सतर्कतेमुळे पाण्यातून बाहेर काढण्यात आल्या.
शनिवार हा दिवस गावात आठवडी बाजाराचा असल्यामुळे भाजीपाला तसेच इतर दुकानदारांची चांगलीच या पावसामुळे तारांबळ उडाली. रस्त्याच्या कडेला असणाऱ्या सखल भागातील अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. त्यामुळे अन्नधान्य तसेच इतर घरगुती साहित्याचे नुकसान झाले आहे.