लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदा जूनपासून लागून राहिलेल्या पावसाने शेतकऱ्यांना उसंत दिली. मात्र, पीक काही घरी येऊ दिलेले नाही. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांध्ये पाऊस १०० टक्क्क््यांहून अधिक कोसळला. आता सोयाबीनची सवंगणी करून मळणीची लगबग सुरू असताना आकाशात ढगांची रुंजी सुरू आहे. काही तालुक्यांमध्ये बुधवारी रात्री ते गुरुवारी सकाळपर्यंत जोरदार पाऊस झाला. शुक्रवारीदेखील ढगांचा गडगडाट सुरूच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मळणी तूर्तास लांबणीवर टाकल्याचे चित्र आहे.जिल्ह्यात गुरुवारी सर्वाधिक पाऊस वरूड तालुक्यात ४४.६ मिमी, चांदूर बाजार ३०.९ मिमी, मोर्शी २४.४ मिमी, अमरावती १९ मिमी, अचलपूर १७.६ मिमी, भातकुली १२ मिमी, चिखलदरा १०.६ मिमी असा दुहेरी आकड्यात कोसळला. इतर ठिकाणी कमी पाऊस झाला. मात्र, ढगाळ वातावरणाने शुक्रवारीदेखील पिच्छा सोडलेला नाही. सकाळपासून ढगांचे आच्छादन होतेच. दुपारनंतर जोरदार मेघगर्जनेसह काही ठिकाणी पाऊस कोसळला. शुक्रवारी सकाळी १० वाजेपर्यंतच्या पर्जन्यमान अहवालात सर्वाधिक पाऊस चांदूर बाजार तालुक्यात १५.५ मिमी झाल्याची नोंद आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका सोयाबीन पिकाला बसत आहे. काही शेतात सोयाबीन कापून त्याच्या मुठी ठिकठिकाणी टाकलेल्या आहेत. काही शेतांमध्ये ताडपत्री, प्लास्टिक पन्नीने सोयाबीनचे ढीग झाकले आहेत. मात्र, ज्या अल्पभूधारक शेतकºयांकडे ढीग झाकण्यासाठी काहीच सुविधा नाही, ते दैवावर हवाला देऊन चिंताग्रस्त चेहऱ्याने आकाशाकडे पाहत आहेत. याशिवाय अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन काढून घरी आणला असला तरी शेतमालातील ओलावा निघून जावा, यासाठी वाळविण्यासाठी टाकला आहे. सोयाबीन पीक अतिशय संवेदनशील असून, पाण्याचा थेंब लागताच दाणा फुगतो व डागाळतो. त्यामुळे पावसाची चिन्हे पाहून हा पसरविलेला शेतमाल एकत्र करताना संपूर्ण कुटुंबाची तारांबळ होत आहे.चांदूर रेल्वे तालुक्यात सोयाबीन काढण्याची लगबगचांदूर रेल्वे : तालुक्यात सोयाबीन काढणीचा वेग आला आहे. पावसाच्या वातावरणामुळे लवकरात लवकर सोयाबीन काढून घरी यावे, याचे नियोजन शेतकरी करीत आहेत.तीन दिवसांपासून अकाली पावसाची तालुक्यात रिमझिम सुरू केली. सोयाबीन काढणीच्या वेळी पाऊस आल्याने ताडपत्री घेणे व ताडपत्रीने संपूर्ण गंजी झाकून देणे, यामध्ये शेतकरी व मजूर वर्ग गर्क झाला आहे. शेतकऱ्याच्या सोयाबीनला एकरी खर्च ३० हजार रुपये असताना, यावर्षी उत्पादन एकरी दोन क्विंटलच्या आसपास राहिले आहे. यात लागवड ते काढणीचा खर्च निघत नसल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे काही वर्षे दुष्काळाच्या कचाट्यात सापडलेला शेतकरी यंदा कर्जाच्या मगरमिठीत जाणार आहे.
पुन्हा ढगाळ : शेतकऱ्यांची धाकधूक वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 5:00 AM
जिल्ह्यात गुरुवारी सर्वाधिक पाऊस वरूड तालुक्यात ४४.६ मिमी, चांदूर बाजार ३०.९ मिमी, मोर्शी २४.४ मिमी, अमरावती १९ मिमी, अचलपूर १७.६ मिमी, भातकुली १२ मिमी, चिखलदरा १०.६ मिमी असा दुहेरी आकड्यात कोसळला. इतर ठिकाणी कमी पाऊस झाला. मात्र, ढगाळ वातावरणाने शुक्रवारीदेखील पिच्छा सोडलेला नाही. सकाळपासून ढगांचे आच्छादन होतेच. दुपारनंतर जोरदार मेघगर्जनेसह काही ठिकाणी पाऊस कोसळला.
ठळक मुद्देपावसामुळे झाकल्या सोयाबीनच्या गंज्या : मळणी लांबली, पीक हातचे जाण्याची भीती