लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : येथील बियाणी चौक स्थित भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत चार पारधी समाजाच्या महिलांना मुद्रा लोन देण्यासाठी सोमवारी नकार देण्यात आला. त्यामुळे या महिलांनी एकच गोंधळ घातला. एवढेच नव्हे, कर्जासाठी अर्ज देण्यासही टाळाटाळ केल्याची बाब निदर्शनास आली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्यांना रोजगार, उद्योगधंदे उभारण्यासाठी जाहीर केलेल्या मुद्रा लोन योजनेचा शासनाकडून प्रचार, प्रसारहोत असला तरी प्रत्यक्षात बँकेतून लाभार्थ्यांना सहकार्य मिळत नसल्याचे वास्तव आहे. येथील वडाळी परिसरातील चार पारधी महिला मुद्रा लोन घेणासाठी सोमवारी स्टेट बँकेत गेल्या. मात्र, त्यांचे कुणीही ऐकून घेत नव्हते. कर्ज प्रकरणाचे प्रबंधक पंकज चिखले यांच्याकडे त्यांनी मुद्रा लोनसंदर्भात माहिती घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, चिखले यांनी अनिल जाधव, संगीता चव्हाण, ऋतिक चव्हाण, दीपिका पवार, प्रवीण पवार, सारिका पवार या पारधी समुदायाला उडवाउडवीची उत्तरे दिली. वडाळीच्या पारधी बेड्यावर अन्य पारधी समाजाच्या लोकांना मुद्रा लोन दिला. आम्हाला का नाही, असा सवाल संगीता चव्हाण यांनी प्रबंधकांना केला. मात्र, 'एसबीआय बँक म्हणजे एका ठरावीक वर्गासाठी काम करणारी यंत्रणा', असे उत्तर कर्ज विभागाकडून मिळाले. त्यामुळे पारधी महिलांनी बँकेत गोंधळ घातला. पंकज चिखले यांच्यासोबत त्यांनी शाब्दिक वाद केला. त्यानंतर पोलीस बँकेत दाखल झाले. पारधी महिलांच्या कर्जाविषयीच्या व्यथा प्रसार माध्यमांच्या काही प्रतिनिधींनी एसबीआयचे प्रबंधक कुंभारे यांना सोडविण्याबाबत कळविल्यानंतर बँकेने दोन तासांनी त्यांना मुद्रा लोनसाठी अर्ज दिले. अन्य नागरिकांप्रमाणे आम्हालाही न्याय मिळावा, अन्यथा कायदा हातात घेऊ असा इशारा या महिलांनी दिला.९ महिन्यांत मुद्रा लोनची ११ प्रकरणे मंजूरएसबीआय बँकेचा डोलारा असला तरी गरीब, सामान्यांना शासकीय योजना, कर्जपुरवठा करण्यासाठी फारसा पुढाकार घेत नसल्याचे वास्तव पुढे आले आहे. येथील बियाणी चौकातील एसबीआय बँकेने ९ महिन्यांत मुद्रा लोनचे केवळ ११ प्रकरणे मंजूर केल्याची माहिती बँकेने दिली आहे. १४ लाख ५१ हजार ३०० रूपयांचे कर्ज वाटप केले आहे. त्यामुळे मुद्रा लोन या केंद्र सरकारच्या योजनेचा खरेच नागरिकांना लाभ मिळतो का, हा संशोधनाचा विषय आहे.
पारधी महिलांचा मुद्रा लोनसाठी गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2019 11:05 PM
येथील बियाणी चौक स्थित भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत चार पारधी समाजाच्या महिलांना मुद्रा लोन देण्यासाठी सोमवारी नकार देण्यात आला. त्यामुळे या महिलांनी एकच गोंधळ घातला. एवढेच नव्हे, कर्जासाठी अर्ज देण्यासही टाळाटाळ केल्याची बाब निदर्शनास आली.
ठळक मुद्देएसबीआय बँकेत दखल नाही : कर्जासाठी अर्ज देण्याससुद्धा टाळाटाळ