नरेंद्र जावरे
चिखलदरा (अमरावती) : मुख्यमंत्री साहेब, एक वेळच्या भाजीसाठी पती तलावात गेले होते. मासे-खेकडे मिळतील ते आणून आम्ही जेवणार होतो. त्यांना कुठे माहीत, मरावे कुठे? महाराष्ट्र की मध्य प्रदेशात? माझं कुंकू गेलं. आम्ही निराधार झालो. तुमचा कायदा आमच्याआड आला आहे. तुम्ही मदत देत नसाल, तर केंद्राने द्यावी, या आशयाचे पत्र मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांच्यासह राज्य शासनाला ग्रामपंचायत सदस्य जया सलामे यांच्या माध्यमातून मरसकोल्हे कुटुंबीयांनी पाठविले आहे.
मेळघाटातील काजलडोह गावानजीक मध्य प्रदेशात कवड्या गावातील तलावातून रविवारी भाजीला काही नाही म्हणून रोजंदारीवर पोट भरणारे शंकर मरसकोल्हे (३२), मुलगा सागर (१२) व पुतण्या कार्तिक बिरू मरसकोल्हे (१३) हे खेकडे-मासे पकडायला गेले होते. तलावात बुडून तिघांचा मृत्यू झाला आणि पंचक्रोशीत शोककळा पसरली. कर्ता गेल्याने कुटुंब सैरभैर झाले असताना तलाव मध्य प्रदेशात असल्याने सरकारी मदतीपासून वंचित झालेली शंकरची पत्नी व मुलगा गमावलेला भासरा बिरू राज्य शासनाकडून मदतीची वाट बघत आहे. मदतीची मागणी सरपंच राजेश कवडे, सदस्य जया सलामे यांच्यासह आदिवासी गावकऱ्यांनी केली आहे.
सागर, आयुष जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी
दुर्दैवी घटनेतील मरसकोल्हे कुटुंबात सागर व कार्तिक हे काजलडोह येथील शाळेत इयत्ता चौथी व पाचव्या वर्गातील विद्यार्थी राजीव गांधी अपघात विमाअंतर्गत एक लाख रुपये दिले जाते. मात्र, सुटीचा कालावधी असल्याने या विद्यार्थ्यांच्या मृत्यूबद्दल शासन कुठला निर्णय घेते, हे अनुत्तरित आहे.
माझा पती, मुलगा गेला. आता जगावं कसं? आकाशाला ठिगळं भरपूर, लावायचे किती? आम्ही भारताचे रहिवासी एवढेच आम्हाला माहिती आहे. मदतीची मागणी केली आहे, शासनाने ती द्यावी.
- सुमन शंकर मरसकोल्हे, काजलडोह, चिखलदरा