गणेश देशमुख - अमरावतीअमरावती : अमरावतीचे 'भाचे' असलेले देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झालेत. अवघी इंद्रपुरी हर्षोल्हासात न्हाली. मुख्यमंत्र्यांच्या आगमनाने बालाजी प्लॉट परिसराचे भाग्य उजळले आहे. आवश्यक सोईसुविधांसाठी आसुसलेल्या उर्वरित अंबानगरीचेही दिवस 'सीएम'च्या येण्याने नाही काय पालटू शकणार?बालाजी प्लॉट परिसरात कलोती यांच्याकडे मुख्यमंत्री येणार असल्यामुळे अत्यंत तातडीने सिमेंट काँक्रीटचे रस्ते निर्माण करण्यात आलेत. आकर्षक फुटपाथ रातोरात तयार झालेत. कलोती यांच्या घराजवळ असलेले कायम तुंबलेले कचऱ्याचे कंटेनर अचानक नाहीसे झाले. माणसांनी रमावे असा तो परिसर आता झाला आहे. आमच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी या पायघड्या अंथरल्याचा अमरावतीकरांना मनापासून आनंद आहे. 'विदर्भाची सांस्कृतिक राजधानी' असा भूषणावह दर्जा लाभलेल्या अमरावतीत 'आपल्यां'चे स्वागत याच रितीने व्हायला हवे. या मातीचा तो गुणधर्मच! मुख्यमंत्री राज्याच्या मंत्रिमंडळाचे प्रमुख आहेत. अवघे राज्य हे त्यांचे कुटंब. राज्यभरातील नागरिकांचे पालकत्त्व मुख्यमंत्र्यांच्या शिरावर आहे. तसे बालाजी प्लॉट परिसरात ते नात्याने मामा असलेल्या कलोती यांच्या घरी येत असलेत तरी आगळ्या अर्थाने या अंबापुरीतील प्रत्येक नागरिक त्यांच्या कुटुंबाचाच सदस्य होय. मग पालक येत असतील तर सत्यता त्यांच्यापासून लपविण्याचे कारण काय? उलटपक्षी जे जसे आहे ते वास्तव त्यांच्यासमोर तसेच सादर व्हायला नको काय? मुख्यमंत्री जाताहेत त्या बालाजी प्लॉट परिसरात कालपर्यंत खड्यांमध्ये रस्ते शोधावे लागायचे. साफसफाई होणार म्हणजे जणू दिवळसण, अशी स्थिती. त्या भागातील शेकडो लोक आजतागायत ज्या व्यवस्थेत वास्तव्य करीत आले आहेत त्याच व्यवस्थेत राज्याचे मुख्यमंत्रीही दाखल शकले असते ना!
सीएमच्या आगमनाने अवघ्या अंबापुरीचे उजळावे भाग्य!
By admin | Published: November 27, 2014 11:25 PM