अमरावती: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सत्ता परिवर्तन झाले आहे. त्यात आमदार बच्चू कडू यांची अध्यक्षपदी तर अभिजित ढेपे यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. बहुमत असतानाही माजी आमदार वीरेंद्र जगताप यांचा एका मताने अध्यक्षपदाच्या निवडीत पराभव झाला. सोमवार हा दिवस जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत नाट्यमय घडामोडींचा ठरला आहे. या निकालाने काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख व माजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या सहकार पॅनेलला हादरा बसला आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सहकार पॅनलचे १३ संचालक आहेत, तर आमदार बच्चू कडू यांच्या परिवर्तन पॅनलचे सहा आहेत. दोन अपक्ष संचालक म्हणून निवडून आले आहेत. संख्याबळानुसार सहकार पॅनेलचा विजयी निश्चित मानले जात होता. मात्र, सोमवारी (दि.२४) अचानकच बँकेचे संचालक असलेले आ. बच्चू कडू यांनी थेट अध्यक्षपदाकरिता काँग्रेसचे माजीआमदार वीरेंद्र जगताप यांच्या विरोधात अर्ज दाखल केला, तर उपाध्यक्षपदासाठी अपक्ष अभिजित ढेपे यांनी हरिभाऊ मोहोड यांच्या विरोधात अर्ज दाखल केला.
बच्चू कडू यांनी उमेदवारी दाखल केल्याने निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण झाली होती. दुपारी २ वाजेच्या सुमारास मतमोजणीनंतर बच्चू कडू यांनी अध्यक्षपदी, तर अभिजित ढेपे यांची उपाध्यक्षपदी निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केले. दोघांनाही ११ मते, तर वीरेंद्र जगताप व हरिभाऊ मोहोड यांना १० मते मिळाली. काँग्रेसच्या कोट्यातील तीन मते फुटल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले.
सभेला बँकेचे संचालक बबलू देशमुख, आमदार तथा संचालक बळवंत वानखडे, वीरेंद्र जगताप, सुधाकर भारसाकळे, हरिभाऊ मोहोड, श्रीकांत गावंडे, मोनिका मार्डीकर, दयाराम काळे, सुरेखा ठाकरे, सुनील वऱ्हाडे, बाळासाहेब अलोणे, प्रकाश काळबांडे तर बच्चू कडूंसह त्यांच्या गटाचे आनंद काळे, जयप्रकाश पटेल, अजय मेहकरे, चित्रा डहाणे, रवींद्र गायगोेले, माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे, अभिजित ढेपे उपस्थित होते.