अमरावती : जिल्हा सहकारी बँक निवडणुकीत नामांकन दाखल करण्याची प्रक्रिया आटोपली आहे. मात्र, कोण उमेदवार कोणत्या पॅनलमधून निवडणूक लढविणार, हे अद्यापही निश्चित नाही. अनेकांनी नामांकन दाखल करून संचालकपद काबीज करण्यासाठी रणनीती चालविली आहे. असे असले तरी सहकार नेते पॅनलची घोषणा करण्यासाठी तूर्त ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत असल्याचे चित्र आहे.
जिल्हा बँक निवडणुकीत २१ संचालकपदांसाठी १६८६ मतदारसंख्या आहे, तर आतापर्यंत १०५ उमेदवारांचे अर्ज वैध असल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. एकंदर ही निवडणूक ‘हॉट’ होत चालली आहे. सहकार विरुद्ध परिवर्तन असे दोन पॅनल आमने-सामने असतील, असे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. परंतु, नामांकन दाखल होऊनही पॅनल घोषित होत नसल्याने याबाबत पडद्यामागे राजकारण सुरू आहे.
एका पॅनलमध्ये २१ उमेदवार जाहीर केले जातील, असे दिसून येते. मात्र, सहकार नेते पॅनल का घोषित करीत नाही, यात बरेच काही दडले आहे. काही उमेदवारांनी वेळीच नामांकन दाखल केले असल्याने त्यांना कोणत्या पॅनलमध्ये स्थान मिळते, यावरही बरेच अवलंबून आहे. २२ सप्टेंबरपर्यंत नामांकन माघार घेण्याचा अवधी आहे. त्यामुळे कोण मैदान सोडते आणि कोण कायम राहते, यावरही पॅनलची घोषणा महत्त्वाची ठरणारी आहे. आता २२ सप्टेंबरपर्यंत उमेदवार वजा मतदारांच्या सेटिंगवर भर दिला जात आहे. काही मतदार मुंबई, गोवा, जळगाव वारीवर असल्याची माहिती आहे. एकूणच दोन्ही पॅनलचे नेते मतदारांना प्रलोभन, आमिष देण्याकडे भर देत आहेत. अगोदर विजयाचे गणित, नंतर पॅनलची घोषणा अशी रणनीती सहकार नेत्यांनी आखली आहे.
---------------------
महिलांमध्ये संचालकपदांसाठी रस्सीखेच
जिल्हा बँक निवडणुकीत दोन महिला संचालकपदांसाठी प्रचंड रस्सीखेच आहे. प्रमुख दोन्ही पॅनलच्या नेत्यांची महिला उमेदवारी निश्चित करताना दमछाक होत असल्याचे चित्र आहे. दोन महिला संचालकपदासाठी १३ नामांकन दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे महिला राखीव प्रवर्गातून कोणाला उमेदवारी घोषित होते, हे २२ सप्टेंबरनंतरच स्पष्ट होईल, असे चित्र आहे.
-----------------
पटेल, देशमुख यांच्या अपिलावर १४ ला सुनावणी
आमदार राजुकमार पटेल, जयश्री देशमुख यांचे नामांकन अवैध ठरविण्यात आले आहे. त्यामुळे या दोघांनीही वकिलामार्फत जिल्हा निबंधकांकडे अपील दाखल केले आहे. राजकुमार पटेल यांचे अनुसूचित जाती-जमाती, तर जयश्री देशमुख यांचे महिला राखीव प्रवर्गासाठी सुनावणी महाराष्ट्र सहकारी अधिनियम १९६० चे कलम १५१ अंतर्गत विभागीय सहनिबंधक राजेंद्र दाबेराव यांच्याकडे होणार असल्याची माहिती ॲड. किशोर शेळके यांनी दिली.