चिखलदरा (अमरावती) : अमरावती शहरातील रहिवासी अल्पवयीन तरुणाचा चिखलदरा येथील चिचाटी धबधब्याखालील डोहात पाय घसरून पडल्यानंतर बुडून मृत्यू झाला. ही घटना १३ जुलै रोेजी दुपारी १.३० वाजता घडली. खासगी कोचिंग क्लासकडून सहल आयोजित करण्यात आल्याने तो आला होता. मृत्यूनंतर चिखलदरा पोलिसांना न कळवता त्याचा मृतदेह थेट परतवाडा व तेथून अमरावती येथील खासगी रुग्णालयात आणण्यात आला होता.
पोलीस सूत्रांंनुसार, श्रीनिधी प्रवीण सकळकळे (१६, वृंदावन वसाहत, गणेशनगर, साईनगर, अमरावती) असे मृतचे नाव आहे. श्रीनिधी हा अमरावती शहरातील गणेशनगर येथील खासगी कोचिंग क्लासेसमध्ये शिक्षण घेत होता. मंगळवारी या कोचिंग क्लासेसतर्फे विद्यार्थ्यांसाठी सहलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार विद्यार्थी चिचाटी येथील धबधब्यावर गेले. श्रीनिधी याचा धबधब्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनंतर तेथे उपस्थित असलेल्या शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी त्याला परतवाडा येथील दवाखान्यात व त्यानंतर अमरावती येथील एका खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. घटनेची फिर्याद शिक्षक विक्रम विजय तळोकार (रा. प्रभात कॉलनी, अमरावती) यांनी राजापेठ पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर घटनेची डायरी राजापेठ पोलिसांनी चिखलदरा पोलिसांना पाठविली. पुढील तपास चिखलदरा पोलीस करीत आहेत. सदर प्रकरण कोचिंन क्लासतर्फे दडपण्याचा प्रकार झाल्याची माहिती पुढे आली आहे.
बॉक्स
बंदीकाळात सहलीचे आयोजन
कोचिंग क्लासेसतर्फे बंदीकाळात विद्यार्थ्यांच्या सहलीचे आयोजन करण्यात आले. दुसरीकडे चिचाटीचा धबधबा व्याघ्र प्रकल्पाच्या अंतर्गत येत असल्याने नियमबाह्यरीत्या ही सहल आहे. त्यामुळे सहलीचे आयोजन करणाऱ्या शिक्षकांवरसुद्धा कारवाई होणे अपेक्षित आहे.
बॉक्स
चिखलदरा पोलिसांना झीरो डायरी प्राप्त झाली आहे. तपासाअंती गुन्हा दाखल करण्यात येईल.
- राहुल वाढिवे, ठाणेदार, चिखलदरा