अमरावती : ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आचारसंहिता लागू करण्यात आली होती. आता मतदान तसेच मतमोजणी प्रक्रिया आटोपल्याने आचारसंहिता संपुष्टात आल्यामुळे खऱ्या अर्थाने आता जिल्हा परिषदेतील विकासात्मक कामांचा मार्ग मोकळा झाला आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगूल वाजताच आचारसंहितेमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांवर वाहन निर्बंध आणण्यासोबतच विकासात्मक कामांनासुद्धा ब्रेक लागला होता. १५ जानेवारीला मतदान, तर १८ ला मतमोजणी प्रक्रिया आटोपल्यानंतर आता निवडणूक आयोगाने आचारसंहिता संपुष्टात येत असल्याचे पत्र जारी केले. त्यामुळे महिनाभरापासून जिल्हा परिषदेच्या विकासकामाला ब्रेक लागला होता. परिणामी आचारसंहिता संपुष्टात आल्याने विकासकामे वेगाने सुरू होतील. त्यासाठी जिल्हा परिषदेतील पदाधिकारी व सदस्यांनी पाठपुरावा पुन्हा नव्या सुरू करण्याचा सपाटा लावला आहे.
बॉक्स
पदाधिकाऱ्यांच्या दिमतीला पुन्हा वाहने
जिल्ह्यातील ५५३ ग्रामपंचायतींच्या निवडणूक आचारसंहितेमुळे जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, विषय समित्यांच्या सभापतींची तसेच पंचायत समितीच्या सभापतीची शासकीय वाहने काढून घेण्यात आली होती. परिणामी महिनाभरापासून जिल्हा परिषद पदाधिकारी खासगी वाहनाने मुख्यालयातील कामकाज करीत होते. आता मात्र पदाधिकाऱ्यांच्या दिमतीला पुन्हा शासकीय वाहने उपलब्ध झाल्याने त्यांच्या दौऱ्यांचाही वेग वाढणार आहे.