अमरावती : विनाअनुदानित शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी लढा देणारे औरंगाबाद येथील शिक्षक गजानन खरात यांचे गुरुवारी हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. खरात हे शासन धोरणाचे बळी ठरल्याचा आरोप करीत विनाअनुदानित शाळा कृती समितीच्यावतीने शुक्रवारी त्यांना सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली.येथील शिक्षण उपसंचालक कार्यालय परिसरात विनाअनुदानित शाळांचे शिक्षक व कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी बेमुदत उपोषण सुरू आहे. कधीतरी अनुदान मिळेल ही आस लावून गत १० दिवसांपासून बेमुदत उपोषण करणाऱ्या शिक्षकांना त्यांचे सहकारी शिक्षक गजानन खरात यांचे निधन झाल्याचे कळताच धक्का बसला. खरात हे शासन धोरणाचे बळी ठरले, असे मत शिक्षकांनी मनोगतातून व्यक्त केले. शासन शिक्षकांच्या मरणाची वाट बघते काय, असा प्रहार कृती समितीने केला. यावेळी गजानन खरात यांना सामूहिक श्रद्धाजंली अर्पण करण्यात आली. शुक्रवारी उपोषणाला माजी राज्यपाल स्व. दादासाहेब गवई यांच्या सुविज्ञ पत्नी कमलताई गवई यांनी भेट देऊन शिक्षकांच्या व्यथा जाणून घेतला. अनुदानाचा प्रश्न सुटला पाहिजे, अशा सदिच्छा त्यांनी दिल्यात. कृती समितीचे सुधाकर वाहुरवाघ, पुंडलिक रहाटे, संगीता शिंदे, मनोज कडू, अनिल पंजाबी, पठाण सर, विस्मय ठाकरे, बाळकृष्ण गावंडे, मोहन पांडे, प्रदीप पुंड, रमेश चव्हाण, गोपाल चव्हाण आदींनी मार्गदर्शन करताना शासन धोरणावर कडाडून प्रहार केला. शुक्रवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास कृती समितीच्यावतीने शिक्षण उपसंचालक कार्यालय ते जयस्तंभ चौकदरम्यान कॅन्डल मार्च काढून गजानन खरात यांना श्रद्धाजंली वाहण्यात आली.
शासन धोरणाचे बळी ठरलेल्या शिक्षकाला सामूहिक श्रद्धांजली
By admin | Published: June 11, 2016 12:07 AM