शासनस्तरावरून १३ सदस्यीय समिती गठित, शासकीय विभागांच्या प्रमुखांचा समावेश
परतवाडा : चिखलदरा पर्यटनस्थळाच्या विकासाकरिता शासनस्तरावरून चिखलदरा विकास समिती गठित करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी अमरावतीच्या जिल्हाधिकारी पवनीत कौर या आहेत. सिडकोच्या अधिकाऱ्यांसह अन्य शासकीय विभागाच्या प्रमुखांचा आणि वन व वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांचा या समितीत समावेश आहे. चिखलदऱ्याच्या विकासात येणाऱ्या अडचणींवर ही समिती कार्य करणार आहे. विकासात्मक कामे मार्गी लावताना येणाऱ्या अडचणी दूर करणार आहे. यात चिखलदरा विकासाला निश्चित अशी गती व दिशा मिळणार आहे. या समितीत जवळजवळ सर्वच शासकीय विभागांच्या प्रमुखांचा समावेश आहे.
शासनाने चिखलदरा अधिसूचित क्षेत्रासाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून सिडकोची निवड केली. चिखलदरा नगर परिषद क्षेत्रासह लगतच्या आलाडोह, मोथा, शहापूर व लवादा या चार महसुली गावांचा त्यात समावेश आहे. या क्षेत्राच्या विकासाकरिता सिडकोने सन २०१५ मध्ये ९८० कोटींचा प्रारूप विकास आराखडा शासनास सादर केला. याला अंशतः शासनाने मान्यता दिली. आराखड्याच्या मान्यतेच्या अधिसूचनेची प्रत सिडको कार्यालयाला सन २०१६ मध्ये प्राप्त झाली.
यात अनेक नवीन विकासात्मक कामे सिडकोकडून प्रस्तावित केली गेली. जागतिक स्तरावर उल्लेख व्हावा, अशा काही योजना या पर्यटन स्थळावर राबविण्याचे, उभारण्याचे नियोजन सिडकोने केले. एक वेलप्लॅन विकसित हिल स्टेशन या विकास आराखड्यात दिले गेले. पण जेव्हा सिडकोने प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली तेव्हा वन व वन्यजीव विभागाची ध्येयधोरणे या कामाच्या आड येऊ लागली. वन व वन्यजीव विभागाची अनुमती त्याकरिता अत्यावश्यक ठरत आहे. यात चिखलदरा पर्यटन स्थळावरील पर्यटनाच्या अनुषंगाने अनेक विकासात्मक कामे रखडली आहेत. ही सर्व कामे विकास समितीच्या अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी पवनीत कौर यांना मार्गी लावावयाच्या आहेत.