अमरावती: राज्य सरकारच्या कंत्राटी नोकरभरतीच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त होत आहे. सरकारच्या खासगीकरण आणि कंत्राटीकरणा विरोधात गुरुवारी संत गाडगेबाबा मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘आगाज मूक मोर्चा’ काढण्यात आला. यावेळी शेकडोच्या संख्येत विद्यार्थी या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. जर शंभर रुपयाच्या शुल्कामध्ये कलेक्टर होता येते तर मग तलाठीसाठी हजार रुपयांचे शुल्क का असा संप्तत सवालही पोस्टरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी उपस्थित केला.
प्रत्येक पालकाला आपला मुलगा आपली मुलगी ही शासकीय सेवेत रुजु व्हावी अशी इच्छा असते. परंतु दिवसेंदिवस वाढत असलेल्या खासगीकरणामुळे शासकीय नोकऱ्यांचे प्रमाण हे कमी झाले आहे. अशातच आता राज्य सरकारने कंत्राटी पद्धतीने अधिकारी-कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा निर्णय घेत ६ सप्टेंबरला या संदर्भातील शासननिर्णय देखील काढला आहे. त्यामुळे सरकारच्या या निर्णयाविरोधात राज्यभरातून सरकारी नोकरीसाठी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमधून संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे गुरुवारी संत गाडगे बाबा मंदीर प्रांगण ते पंचवटी, आरटीओ मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर विदर्भ स्पर्धा परीक्षा शिक्षक, विद्यार्थी संघ कृती समितीच्या वतीने ‘आगाज मुक मोर्चा’ काढण्यात आला. यावेळी शेकडोच्या संख्येने विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झाले होते. त्यामुळे गाडगे नगर परिसरामध्ये काहीवेळा करीता वाहतूक कोंडीही झाली होती. यावेळी विद्यार्थ्यांच्या हातामध्ये असलेल्या पोस्टरमधून त्यांचे प्रश्न सरकारपुढे मांडण्यात आले होते. यावेळी कृती समितीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांची भेट घेत विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.