अमरावती : राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान आणि स्पर्धा २०२४-२५ मध्ये राज्यस्तरीय पारितोषिकांमध्ये सर्वोत्कृष्ट कल्पना, उपक्रम गटातून 'मिशन-२८' उपक्रमासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. या पुरस्काराचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांना सोमवारी मुंबई येथे करण्यात आले. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालयाने मेळघाटच्या दुर्गम भागातील माता आणि बालकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी हा नावीन्यपूर्ण उपक्रम यशस्वीपणे राबविला. याच उत्कृष्ट कार्याची दखल घेत राज्य सरकारने पुरस्कार दिला आहे.या पुरस्कारासोबत जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांना ३० हजार रुपयांचा धनादेशही प्रदान करण्यात आला. विभागीय स्तरावरील निवड समित्यांकडून प्राप्त प्रस्तावामधून व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, क्षेत्रीय कार्यालय, अमरावती यांच्या 'उत्कृष्ट आयटीआय, रोजगार मेळावे, संवाद फोरम' या प्रभावी उपक्रमासाठी १० लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक जाहीर झाले आहे. व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण सहसंचालक प्रदीप घुले यांनी हा पुरस्कार स्वीकारला.