अमरावती : जिल्ह्यातील चंद्रभागा, वासनी खुर्द आणि भगोडी सिंचन प्रकल्पास जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी भेट देऊन प्रकल्पाच्या कामास चालना देण्याच्या दृष्टीने सिंचन अनुशेष प्रकरणे त्वरित मार्गी लावण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या. वासनी खुर्द गावातील आत्महत्याग्रस्त कुटुंबाची भेट घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे सांत्वन केले. तसेच तेथील ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या. गावातील पुनर्वसनाचे प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने भूसंपादन अधिकारी तसेच पुनर्वसन अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. यावेळी उर्ध्व वर्धा प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता लांडेकर, कार्यकारी अभियंता आडे, भूसंपादन अधिकारी व्ही.आर. शिरभाते, उपविभागीय अधिकारी श्यामकांत मस्के, जिल्हा पुनर्वसन अधिकारी मोहन पातुरकर, चांदूरबाजारचे तहसीलदार शरद जवळे, अचलपूरचे तहसीलदार लोणारकर आदी उपस्थित होते. चंद्रभागा प्रकल्पास भेट देऊन हा प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याच्या दृष्टिने या प्रकल्पांतर्गत भूसंपादनाची प्रलंबित प्रकरणे त्वरित निकाली काढण्याच्या सूचना केल्या. या प्रकल्पाची घळ भरणी चालू आहे. गेटचे काम तसेच अन्य तांत्रिक कामे पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी संबंधिताना केल्यात. वासनी खूर्द प्रकल्पास भेट देऊन तेथील नामदेव ढापे या आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याच्या कुटुंबाची भेट घेतली. गावकऱ्यांचे प्रश्न समजून घेतले. पुनर्वसनाचे प्रश्न तातडीने सोडविण्याबाबत निर्देश दिले. शेतकऱ्यांनी धीर खचू न देता हिंमतीने पुढे येण्याचे आवाहन त्यांनी केले. उत्पन्नाची साधने वाढविण्यासाठी शेतीला पुरक जोडधंदे करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
चंद्रभागा, वासनी, भगोडी प्रकल्पाची जिल्हाधिकाऱ्यांकडून तपासणी
By admin | Published: November 22, 2014 12:02 AM