विद्यापीठाचा निर्णय : विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूररोहितप्रसाद तिवारी मोर्शीशासनाच्या अधिनियमाच्या अनुषंगाने राज्यातील महाविद्यालयीन आणि विद्यापीठ छात्रसंघ निवडणुका यावर्षी होणार नसल्याचे विद्यापीठाने जाहीर करताच विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सुरु उमटला आहे. दरवर्षी शैक्षणिक सत्र सुरु होताच महाराष्ट्र विद्यापीठ कायदा आणि संबंधित विद्यापीठाच्या अधिसूचनेस अनुसरून महाविद्यालयीन छात्रसंघाचे गठन प्राचार्यांकडून केल्या जाते. गठित केलेल्या छात्रसंघांच्या विद्यार्थी प्रतिनिधींमार्फत प्रत्यक्ष निवडणुकीव्दारे सचिवाची निवड केली जात असे. २०१५-१६ या शैक्षणिक सत्राकरिता विद्यापीठाच्या निर्देशाप्रमाणे आॅगस्ट महिन्यात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अखत्यारितील महाविद्यालयांनी छात्रसंघाचे गठन केले आहे. सचिवाची निवडणूक ३ सप्टेंबरला होणार होती. त्या आशयाच्या सूचना छात्रसंघाच्या सदस्यांना देण्यात आलेल्या होत्या. ३१ आॅगस्टला विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक गणेश मालटे यांनी महाविद्यालयांना पत्र पाठवून महाविद्यालयातील व विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागातील विद्यार्थ्यांच्या छात्रसंघ निवडणुका ३१ आॅगस्ट २०१६ पर्यंत शासनाच्या अधिसूचनेप्रमाणे पुढे ढकलण्यात आल्याचे कळविले आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अवर सचिव प्रकाश कदम यांनी राज्यातील सर्व अकृषि विद्यापीठाच्या कुलगुरुंना २५ आॅगस्टला पत्र पाठवून महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम १९९४ च्या अनुसूचिमध्ये उल्लेख केलेल्या विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणाच्या निवडणुका ३१ आॅगस्ट २०१६ पर्यंत पुढे ढकलण्याचे निर्देश दिलेले आहे. एवढेच नव्हे, तर निवडणुका घेण्यासंदर्भात कार्यवाही सुरु असल्यास ती तत्काळ थांबविण्याचेही कळविलेले आहे. याच अनुषंगाने विद्यापीठाने छात्रसंघाच्या निवडणुका स्थगित केलेल्या आहेत.
महाविद्यालयीन, छात्रसंघ निवडणूक यंदा नाही
By admin | Published: September 02, 2015 12:11 AM