धीरेंद्र चाकोलकर ।आॅनलाईन लोकमतअमरावती : एखादे श्वान अपघातामुळे वा इतर कारणांनी जर्जर होऊन रस्त्याने विव्हळत पडले असेल, तर दु:ख व्यक्त करण्यापलीकडे कुणी काही करत नाही. मात्र, विद्यार्थिदशेतील काही युवक अशा श्वानांना वैद्यकीय उपचारापासून त्यांना सुरक्षित परिसर मिळवून देण्यापर्यंत धडपडतात.अमरावती शहरातील वसा या सामाजिक संस्थेने मागील एक वर्षापासून हा उपक्रम हाती घेतला आहे. वसाने सर्वप्रथम वाचविलेली कुत्री ही नागपूर येथे भांडेवाडीत प्राणी निवारा केंद्रात स्वखर्चाने रवानगी केली. आजही ती तेथे उपचार घेत आहे. श्वानप्रेमींचा कॉल आल्यानंतर बहुतांश महाविद्यालयीन विद्यार्थीच असलेले संस्थेचे प्रशिक्षित सदस्य तेथे पोहोचून श्वानाला पशू चिकित्सालयात नेतात. वैद्यकीय उपचार मिळाल्यानंतर धडपड असते पुनर्वसनाची. या श्वानांना पूर्वीच्या परिसरातील लोक स्वीकारत असतील, तर तेथेच त्यांच्याकरिता तंदुरुस्त होईपर्यंत भोजन उपलब्ध करून देण्यासाठी प्रबोधन केले जाते. वसाने केलेल्या शुश्रुषेच्या यादीत साप, अजगर, माकड, सायाळ, खार असे ८३ प्राणी व २०० हून अधिक प्राणी आहेत. या उपक्रमात मुकेश वाघमारे, गणेश अकर्ते, भूषण सायंके, रीतेश हंगरे, अभि पुल्लजवार, ऋग्वेद देशमुख, मोहन मालवे, अक्षय क्षीरसागर, सूरज वºहेकर, राहुल सुखदेवे आदींचे सक्रिय योगदान असते.उभी होऊ शकते यंत्रणापशुप्रेमापोटी अनेक जण या क्षेत्रात आहेत. ते पूर्णवेळ कार्यकर्ते आहेत. मात्र, रोजगार नसल्याने खर्चाला मर्यादा येतात. त्यामुळे संपूर्ण नवीन यंत्रणा याबाबत उभी राहू शकते. याशिवाय प्राणी रुग्णवाहिका, पशुुचिकित्सालयात क्ष-किरण यंत्रणा, गॅस अॅनेस्थेशियाची मागणीही यानिमित्ताने पुढे आली आहे.कोणत्याही क्षणी मदतयाबाबत वसाचे शुभम सायंके यांचा अनुभव बराच बोलका आहे. तो उत्तमसरा येथे राहतो. वडील प्राथमिक शिक्षक आहेत. तेच या कामात आर्थिक मदत करतात. अर्जंट कॉलवर एखादेवेळी उपाशीपोटीदेखील गावावरून यावे लागते. रात्री उशीर हा ठरलेला असतो.पॉकेटमनीतून उपचारसरकारी पशुचिकित्सालयाची सुविधा २४ तास उपलब्ध नसते. अशावेळी खासगी पशुचिकित्सकांकडून महागडे उपचार करून घेतले जातात. याकरिता कुठून पैसे मिळण्याची शाश्वती नसल्याने घरून मिळणारा पॉकेटमनी वाचवून किंवा आई-वडिलांकडून घेऊन हा सत्कार्याचा वसा हे विद्यार्थी चालवीत आहेत.