अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालय स्तरावर ऑनलाइन परीक्षांमध्ये काही तांत्रिक कारण अथवा वेळेअभावी परीक्षा देऊ शकले नाही, अशा विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षा मंडळाच्या निर्णयानंतर नव्याने ऑनलाइन परीक्षा घेण्यात येणार असून, वंचित विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.
विद्यापीठाच्या हिवाळी- २०२० ऑनलाइन परीक्षा ३९४ महाविद्यालयात घेण्यात येत आहे. या परीक्षांमध्ये काही विद्यार्थी तांत्रिक तर काही वेळेअभावी परीक्षा देऊ शकले नाही. त्यामुळे शैक्षणिक वर्ष वाया तर जाणार नाही, अशी भीती विद्यार्थ्यांसह पालकांमध्येही आहे; मात्र परीक्षेपासून वंचित विद्यार्थ्याचे हित जोपासत नव्याने परीक्षेची संधी दिली जाणार आहे. या परीक्षा आटोपताच वंचित विद्यार्थांसाठी नव्याने वेळापत्रक निश्चित करण्यात येणार आहे. त्याच महाविद्यालयात पुन्हा ऑनलाइन परीक्षा घेण्यात येतील. त्याकरिता परीक्षा मंडळासमोर हा विषय मंजूर करण्यात येणार आहे. गुरुवार, २४ जूनपासून अभियांत्रिकी, विधी, फार्मसी, कला, वाणिज्य व विज्ञान शाखांच्या परीक्षांना प्रारंभ झाला आहे. ऑनलाइन परीक्षेत सुमारे दोन लाखांच्यावर विद्यार्थी असून, १७०० पेपरच्या परीक्षांचे नियोजन चालविले आहे.
--------
कोट
कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही. काही विद्यार्थी तांत्रिक कारणांमुळे परीक्षा देऊ शकले नाही, अशा तक्रारी आल्या आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना न्याय देण्याची भूमिका असून, परीक्षा मंडळाचा बैठकीत हा प्रश्न मार्गी लावण्यात येईल.
- हेमंत देशमुख, संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ.