अमरावती : रेल्वे प्रशासनाने खासगीकरणाचे धोरण अवलंबल्याच्या विरोधात टाटानगर येथील रेल्वे कर्मचाऱ्यांनी या धोरणाविरोधात बुधवारी अचानक संप पुकारला. या संपाचा फटका देशभऱ्यातील प्रवाशांना बसला. विशेषत: नागपूर-मुंबई या दरम्यान जाणाऱ्या हावडा-कुर्ला शालिमार एक्सप्रेस, हावडा-पुणे, आझाद हिंद एक्सप्रेस या रेल्वेगाड्या रद्द करण्याचा प्रसंग ओढावला. या रेल्वेगाड्यांनी जाणाऱ्या प्रवाशांना तिकीट रद्द करावे लागले. रेल्वेने प्रवासाचे भाडेसुद्धा परत दिले. मात्र प्रवाशांना प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागला. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वेच्या काही विभागात खासगीकरण सुरू केले आहे. या धोरणाचा कम्युनिस्ट पक्षाने जोरदार विरोध चालविला आहे. याच श्रुंखलेत टाटानगर येथे नॅशनल रेल्वे मजदूर युनियनच्या नेतृत्वात बुधवारी संप पुकारण्यात आला. टाटानगर येथून जाणाऱ्या सर्वच गाड्या रेल्वे कर्मचाऱ्यांनी रोखून धरल्याची माहिती आहे. परिणामी बडनेरा मार्गे जाणाऱ्या दोन गाड्या रद्द करण्यात आल्या. उर्वरित गाड्या नियमित वेळेवर सोडण्यात आल्याची माहिती आहे. आझाद हिंद एक्सप्रेसने पुणेकडे जाणाऱ्या प्रवाशांना अचानक प्रवास रद्द करण्याचा प्रसंग ओढावल्याने ट्रॅव्हल्सने पुणे गाठावे लागले. गोंदिया-मुंबई विदर्भ एक्स्प्रेस, अमरावती - मुंबई एक्स्प्रेस, नागपूर-अमरावती इंटरसिटी एक्स्प्रेस, अमरावती - नागपूर पॅसेंजर या गाड्या नियमित सोडण्यात आल्यात. काही गाड्या इटारसीमार्गे सुटल्याची माहिती आहे.
संपाचा फटका, दोन रेल्वेगाड्या रद्द
By admin | Published: January 22, 2015 12:01 AM