लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मतदार यादीत यापुढे सर्व मतदारांची रंगीत छायाचित्रे राहणार आहेत. ज्यांचे छायाचित्र अद्यापही यादीत नाही किंवा जुनेच छायाचित्र असणाऱ्या मतदारांनी विहित मुदतीत ते तहसील कार्यालयात सादर करणे आवश्यक असल्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. मतदारयादीत यापुढे सर्वच मतदारांची रंगीत छायाचित्रे अनिवार्य करण्यात आले आहे. दरम्यानच्या काळात काही मतदारांची कृष्णधवल छायाचित्रे यादीत समाविष्ट करण्यात आली होती.यानिर्णयाच्या अनुषंगाने आता सर्व मतदारसंघांमध्ये रंगीत छायाचित्र मतदार यादीत जोडण्याचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. मतदार यादीत नाव समाविष्ट आहे; परंतु, छायाचित्र नसणाऱ्या मतदारांना त्यांचे पासपोर्ट आकारातील रंगीत छायाचित्र जोडावे लागणार आहे. मतदारांना त्यांच्या नावापुढे रंगीत फोटो आहे किंवा नाही, आयोगाच्या संकेत स्थळावर किंवा तहसील कार्यालयात पाहता येऊ शकते. स्क्रिनवरील मतदार कार्डवर छायाचित्रासंदर्भात पडताळणी केल्यानंतर छायाचित्र न आढळल्यास मतदारांना त्यांच्या विधानसभा मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांशी (बीएलओ) संपर्क साधून रंगीत छायाचित्र सादर करावे लागेल. बीएलओकडे छायाचित्र नसलेल्या मतदारांची यादीसुद्धा उपलब्ध आहे.विशेष मोहीम : निवडणूक विभाग लागला कामाला२२ जुलै रोजी विशेष मोहीम मतदार याद्या अद्यावतीकरणाचे काम वेगाने पूर्ण व्हावे, यासाठी २२ तारखेला महिन्याच्या चवथ्या शनिवारी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. सर्वच तहसील कार्यालयातील निवडणूक विभाग यादिवशी सुरू राहतील. नागरिक याठिकाणी जाऊन रंगीत छायाचित्रांसह मतदार यादीसंबंधी समस्यांचे समाधान करून घेऊ शकतात.
मतदार यादीत आता रंगीत छायाचित्र अनिवार्य
By admin | Published: July 14, 2017 12:35 AM