नितीन देशमुख यांच्या गजलेला श्रीजय चव्हाण यांचा स्वसाज, जगदंब मित्र परिवाराचे आयोजन
चांदूर बाजार : जगदंब मित्र परिवाराने नुकतीच मराठी गजलांची मैफील जगदंब सांस्कृतिक सभागृहात आयोजित केली होती. सुप्रसिद्ध गझलकार व कवी नितीन देशमुख यांच्या दर्जेदार गजल श्रीजय चव्हाण या उभरत्या संगीतकाराने अप्रतिम चालीत सादर केल्या.
मोजके रसिक व आभासी पद्धतीने रंगलेल्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून ठाणेदार सुनील किणगे, नगराध्यक्ष नितीन कोरडे, मनोज कटारिया व विनोद कोरडे हे उपस्थित होते. त्यानंतर लगेचच ‘केले हजार वादे अन् पक्षपात केला, माझ्याच माणसांनी माझाच घात केला, ओठावरी तिच्या मी अंगार पेटविला, संगीन हा गुन्हाही भर पावसात केला’ या मैफलीचे बहारदार व निवेदन खुद्द कवी नितीन देशमुख यांनी खुमासदार शैलीत केल्याने मैफील अधिकच रंगत गेली. त्यानंतर ‘मी प्रेम खूप केले ज्याचा न अंत आहे, पैशात मोजले तू इतुकीच खंत आहे’ या गजलेने रसिकांच्या काळजाला हात घातला. ‘संस्कार सभ्यतेचा झालाय फास हल्ली, इतका भलेपणाचा होतोय त्रास हल्ली, झाडावर भरवसा उरला न पाखरांचा, बुंध्यातुनी कटाचा येतोय वास हल्ली’ या रचनेने वास्तवाचे भान दिले. निवेदनातूनच नितीन देशमुख यांनी काही गझला तरन्नुममध्ये सादर केल्याने मैफिलीत अधिक रंग भरला. यासोबतच ‘माझ्या तुला व्यथेचा अंदाज येत नाही, अश्रूमधून काही आवाज येत नाही, तो शहाजन होता तू फक्त जान आहे, वाट्यास हरघडीला मुमताज येत नाही’ या गझलेने तर मैफीलच जिंकली. यावेळी मराठी गझल गायकीचे भविष्य श्रीजय चव्हाण यांचे सारख्या गझलगायकांचे हाती सुरक्षित असल्याचे नितीन देशमुख म्हणाले. ‘डाळिंबाच्या ओठांवरती कडुनिंबाचे गाणे’ या गझलेने मैफलीची सांगता झाली. तबल्यावर अजय चव्हाण व व्हायोलिनवर हरीश लांडगे यांनी उत्तम साथ दिली. कार्यक्रमासाठी जगदंब मित्रपरिवाराचे सहकार्य मोलाचे ठरले.