अमरावती : शेतकरी आंदोलन रुग्णसेवा, दिव्यांग सेवेतून समाजकारण व राजकारण असा प्रवास करणारे आ. बच्चू कडू यांना शिंदे-फडणवीस सरकारने स्थापन केलेल्या दिव्यांग कल्याण विभागाच्या दिव्यांग कल्याण विभाग मंत्रालय दिव्यांगांच्या दारी, या उपक्रामासाठी गठित समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून, त्यांना मंत्रिपदाचा दर्जा बहाल करण्यात आला आहे.
राज्य सरकारकडून नव्याने निर्माण करण्यात आलेल्या दिव्यांग कल्याण विभागाच्या दिव्यांग कल्याण विभाग मंत्रालय दिव्यांगांच्या दारी या लोककल्याणकारी उपक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक व अध्यक्ष म्हणून आमदार बच्चू कडू यांची निवड करण्यात आली आहे. त्यांना दिव्यांग कल्याण विभाग मंत्रालयाचा मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. यासंदर्भातील शासननिर्णय २३ मे २०२३ रोजी निर्गमित करण्यात आला आहे. त्यांना मंत्र्यांच्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचे निर्गमित झालेल्या शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.
राज्यातील सर्व जिल्ह्यात ६ जून २०२३ पासून प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. दिव्यांग व्यक्तींशी संबंधित सर्व योजना या अभियानांतर्गत शिबिरामध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी राज्यस्तरावर एक समिती गठित करण्यात आली आहे.