फ्लेमिंगो पक्ष्यांना मायदेशीचे वेध: पावसाची चाहूल, सहा महिन्यानंतर रवाना
अमरावती: थंडीची चाहूल लागताच सहा महिन्यांसाठी मुक्कामास येणाऱ्या फ्लेमिंगो पक्ष्यांना आता पावसाळा सुरू होताच मायदेशी परतण्याचे वेध लागले आहेत. वडाळी, छत्रीतलाव, मालखेड तलाव आदी ठिकाणी मुक्कामास असलेले फ्लेमिंगो (रोहित) हळूहळू परतू लागले आहेत. पावसाळा अगदी तोंडावर असताना फ्लेमिंगो आता ‘आ अब लौट चले... ’ असे म्हणत मायदेशी परतू लागले आहेत.सैबेरिया, रशिया तसेच इतर देशांमधून फ्लेमिंगोसह विविध प्रजातींचे पक्षी दरवर्षी वडाळी, छत्रीतलाव, अप्पर वर्धा, मालखेड, शेवती विद्यापीठ आदी तलावांवर येतात. साधारणपणे थंडीच्या दिवसात येणारे फ्लेमिंगो सुमारे सहा महिन्यांचा मुक्काम ठोकून पावसाळा सुरु होण्यापूर्वी मायदेशी परतात. फ्लेमिंगो पक्ष्यांचा हा दरवर्षीचा शिरस्ता आहे. स्थानिक मालखेड तलाव, अप्परवर्धा धरण, वडाळी, छत्रीतलाव परिसरात फ्लेमिंगो पक्ष्यांचे मुख्य खाद्य असलेले मासे, कीटकांचा मोठा साठा असल्याने हे पक्षी येथे स्थलांतरित होतात. यामध्ये फ्लेमिंगो, चित्रबदक, ब्लॅक हेडेड ईबीज, सीगल, बी-ईटर, समुद्री गरुड तसेच ओपन हेड बील या विविध जातीच्या पक्ष्यांचा ृअभ्यास करण्यासाठी पक्षीमित्र व अभ्यासक आर्वजून तलावावर हजेरी लावतात. मान्सूनचे आगमन होत असताना हे स्थलांतरित पक्षी परतीचा प्रवास सुरु करीत असल्याचे चित्र पाहायला मिळते. गत दोन दिवसांपासून वडाळी, छत्री तलावावर मुक्कामी असलेले फ्लेमिंगो मायदेशी रवाना होत असल्याची माहिती वडाळी उद्यानाचे कंत्राटदार बंधे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. गुलाबी धवल कांतीचा फ्लेमिंगो सहा महिन्याच्या मुक्कामानंतर मायदेशी जात आहेत. मायदेशी परतनाना ते कोठे जातात, काय खातात, नवीन पक्ष्यांना जन्म देतात की नाही, याचा काहीही थांगपत्ता लागत नाही, असेही बंधे म्हणाले. फ्लेमिंगासह अन्य प्रवासी पक्ष्यांच्या अभ्यासासाठी वडाळी, मालखेड, विद्यापीठ तलाव परिसर सोयीचा ठरतो. मुसळधार पावसापासून बचाव करण्यासाठी ते मायदेशी ते परत जात असावे, असा पक्षीमित्रांचा अंदाज आहे.मालखेड तलाव, अप्पर वर्धा धरणावर साधारणपणे फ्लेमिंगो पक्षी वास्तव्यास येतात. हिवाळ्याच्या शेवटी आणि उन्हाळ्याच्या प्रारंभी येणारे हे पक्षी पावसाळ्यापूर्वी मायदेशी परतात. मालखेड तलावावर दरवर्षी ते आढळतात. - यादव तरटे, पक्षीमित्र, अमरावती.