अमरावती : जिल्ह्यात मार्च २०२० पासून कोरोनाचा संसर्ग सुरू आहे. सुरुवातीचा कालावधी वगळता सप्टेंबरमधील पहिली व यंदा फेब्रुवारी ते मे दरम्यानची दुसरी लाट या कालावधीतील सर्वात कमी सहा रुग्णांची नोंद बुधवारी शहरात झाली. यामध्ये ०.८९ पॉझिटिव्हिटिची नोंद झाल्याने दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा पहिल्या रुग्णाची नोंद ४ एप्रिल रोजी झाली असली तरी, त्याच्या एक महिनापूर्व जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक उपाययोजना सुरू आहेत. या कालावधीपासून डिसेंबरपर्यंत कोरोनाची रुग्णसंख्या शहरात जास्त होती. त्यानंतर ग्रामीणमध्ये ५२४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकी झाल्यानंतर ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढला. मार्चअखेर शहरातील रुग्णसंख्या कमी होऊन ग्रामीणमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढायला लागला. शहरापेक्षा ग्रामीणमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या दुपटीने वाढायला लागली. आता मात्र शहरासह ग्रामीणमध्ये कोरोनाचा संसर्ग माघारला आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत फेब्रुवारीपासून कोरोना संसर्ग वाढल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी २१ फेब्रुवारीपासून कठोर संचारबंदी लागू केली. हे एकप्रकारे मिनी लॉकडाऊन होते. चार महिन्याच्या अंमलबजावणीनंतर जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत जिल्हा अनलॉक करण्यात आला. जून महिन्यात पॉझिटिव्हिटित सातत्याने कमी येत असल्याने जिल्ह्यास दिलासा मिळाला आहे.
बाॅक्स
सोमवारी एक टक्के पॉझिटिव्हिटी
जिल्ह्यात गुरुवारी ४,६०१ रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंत ९५,७७३ कोरोनाग्रस्तांची नोंद झालेली आहे. याशिवाय ४,६०१ नमुन्यांची तपासणी करण्यात आल्यानंतर एक टक्का पॉझिटिव्हिटिची नोंद झालेली आहे. उपचारादरम्यान एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने संक्रमिताच्या मृत्यूची संख्या १,५४७ झालेली आहे. तसेच बरे वाटल्याने ९० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत ९३,६२७ नागरिक संक्रमणमुक्त झाले आहेत.
बॉक्स
पाच दिवसातील पॉझिटिव्हिटी (टक्के)
१९ जून : १.९५
२० जून : १.२०
२१ जून : १.४३
२२ जून : १.५३
२३ जून : ०.८९