- अमित कांडलकर
गुरूकुंज मोझरी (अमरावती) : राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या ५२ व्या पुण्यतिथी महोत्सवाला ब्रह्ममुहूर्तावर शुक्रवारी अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे सर्वाधिकारी प्रकाश महाराज वाघ यांच्या हस्ते महासमाधी स्थळावर तीर्थस्थापना, चरण पादुका पूजन व राष्ट्रसंतांच्या महासमाधी अभिषेकाने श्रीगुरुदेवाच्या गजरात विधीवत आरंभ झाला.
यावेळी गुरुकुंजातील राष्ट्रसंतांच्या महासमाधीस्थळी ब्रह्ममुहूर्तावर सकाळी मोजक्या गुरुदेव भक्तांच्या उपस्थितीत कोविड नियमांचे पालन करून पुण्यतिथी महोत्सवाला सुरुवात झाली. पहाटे ४.३० वाजता चरण पादुका पूजन व महासमाधी अभिषेक करण्यात आला. तीर्थस्थापनेनंतर दरवर्षी महासमाधी स्थळावरच घेण्यात येणारा सामुदायिक ध्यानाचा कार्यक्रम यंदा शासनाने निर्धारित केलेले कोविडच्या नियमाचे पालन करीत सर्वधर्मीय प्रार्थना मंदिरात घेण्यात आला. यावेळी सर्वाधिकारी प्रकाश महाराज वाघ यांनी सामुदायिक ध्यानाच्या कार्यक्रमानंतर प्रार्थनेच्या महत्त्वावर चिंतन प्रस्तुत केले. यावेळी ते म्हणाले, अष्टांग योगात यम, नियम, आसन, प्राणायाम व ध्यान इत्यादी सांगितले आहे. परंतु, सर्वसाधारण माणसाला ध्यान ही कठीण बाब आहे, असे वाटत होते. राष्ट्रसंतांनी ध्यानाला सामुदायिक रुप प्राप्त करून साधना सामुदायिक केली. मानव बने सबके दिल याप्रमाणे राष्ट्रसंतांनी ध्यानाला ध्यानातून माणसाचे मानवपण प्राप्त करण्याकरिता उपयोग झाला पाहिजे. सुंदर मनाशिवाय लक्ष प्राप्त होत नाही. साधनेचा उपयोग मनाच्या शुद्धीकरण करण्याकरिता झाला पाहिजे. तोपर्यंत स्वधर्म साधला जात नाही. मन चंचल असते, माणूस भौतिक सुख दुखातच गुरफटला जातो. त्यामुळे त्याच्या आत्म्याचा आनंद प्राप्त होत नाही. सामुदायिक ध्यानातूनच आत्म्याला आनंद प्राप्त होऊन समाधीची स्थिरता प्राप्त होते. सामुदायिक ध्यानातून सुंदरपणे साधना करून नव्या जगाची निर्मिती करण्यासाठी मानवाच्या विकासातून उन्नतीचा पाया सामुदायिक ध्यानातून निर्माण करता येतो, असेही प्रकाश महाराज वाघ म्हणाले. यावेळी उपसर्वाधिकारी लक्ष्मण गमे, सरचिटणीस जनार्दन बोथे, प्रचार प्रमुख दामोदर पाटील, आध्यात्मिक विभागप्रमुख राजाराम बोथे। रामकृष्णहरी मंदिर अध्यक्ष विलास साबळे, संजय तायडे, जनसेवक जयस्वाल, नीळकंठ हळदे उपस्थित होते.