अमरावती : जिल्हा सत्र न्यायालय व जे.एम.एफ.सी न्यायालयात चालणाऱ्या प्रकरणांत कोर्ट पैरवी म्हणून कामकाज हाताळणाऱ्या पोलीस अंमलदारांची पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी बुधवारी बैठक घेतली. दरम्यान चालू वर्षात न्यायालयीन निकाल लागलेल्या सर्व प्रकरणांचा आढावा घेतला.
यात पोलीस स्टेशन फेजरपुरा येथील अप क्रमांक ६७६/२०१७ कलम ३७६(२) (आय) (ज़) (क़) १८,२३.११, ५०६ भादंविच्या सहकलम ४,६, पोस्कोतील आरोपीस १० वर्षे शिक्षा व दंड, पोलीस ठाणे नांदगाव पेठ येथील अपराध क्रमांक ३४३/२०९७ कलम भादंविचे सहकलम ३,४ पोस्कोमध्ये आरोपीस १० वर्षे शिक्षा झाल्याने संबंधित पैरवी अधिकारी यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीची प्रसंशा करण्यात आली.
तसेच ज्या केसेसमध्ये न्यायालयातून आरोपी निर्दोष सुटले, त्या केसेस कोणत्या कारणाने निर्दोष सुटलेत, याबाबत चर्चा करण्यात आली. यापुढे आरोपी निर्दोष सुटू नये, यादृष्टीने गुन्ह्याचे तपासात कोणत्याच उणिवा राहणार नाही, याबाबत आयुक्त सिंह यांनी निर्देश दिले. सदर बैठकीस पोलीस उपायुक्त परिमंडळ १. २ अमरावती शहर तसेच कोर्ट मॉनिटरींग सेलचे पोलीस अधिकारी, सहपोलीस आयुक्तालयात पैरवी अधिकारी म्हणून काम करणारे सर्व पोलीस अंमलदार हे या बैठकीला उपस्थित होते.
-------------------------------
पैरवी अधिकाऱ्यांनी कोरोना नियमावलींचे पालन करावे
न्यायालय परिसरात पैरवी अधिकारी हे अनेक लोकांच्या संपर्कात येत असल्याने कोविड१९ या आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये, यादृष्टीने जे पैरवी अधिकारी वयस्क आहेत, अशांनी नियमित मास्क लावणे, सॅनिटायझर, ग्लोव्जचा वापर करावा आदी सूचना त्यांनी दिल्यात.