अमरावती : विद्यापीठाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. त्यादिशेने नियोजन सुरू असून, कोविड १९ चा प्रादुर्भाव कमी हाेताच त्याचे निकाल दिसतील, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी येथे केले.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात शनिवारी ना. सामंत यांनी भेट देऊन आढावा घेतला. विद्यापीठ अधिसभागृहात आयोजित कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षस्थानी प्रभारी कुलगुरू विलास भाले होते. प्रमुख पाहुणे म्हणून कुलसचिव तुषार देशमुख, आमदार किरण सरनाईक, शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी विद्यापीठाने केलेल्या विकास कार्याची तसेच विद्यार्थीहितार्थ राबविलेल्या विविध योजना आदींची माहिती कुलसचिव तुषार देशमुख यांनी ना. सामंत यांना दिली. यावेळी ना. सामंत यांनी विद्यापीठ विकासासाठी मागणी वजा प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश दिले.
विद्यापीठाचा विकास व्हावा, यासाठी स्वतंत्र नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करावी व त्या माध्यमातून शासनाशी सातत्याने संपर्क राहील आणि मागण्यांची पूर्तता होण्यास सहाय्यभूत ठरेल. ‘उच्च शिक्षण विभाग आपल्या दारी’ हा कार्यक्रम पुढील महिन्यात विद्यापीठात आयोजित करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
पुढे बोलताना ना. सामंत म्हणाले, विद्यापीठ परिसर निसर्गरम्य व सुंदर असून या परिसरात कोरोना काळात स्थापित झालेल्या प्रयोगशाळेत ३.५ लाखापेक्षा जास्त चाचण्या करण्यात आल्यात. राज्याच्या दृष्टीने फार मोठे काम विद्यापीठाने केले आहे. जास्त चाचण्या केल्यामुळे कोरोनाचा फैलाव कमी झाला, हे सुद्धा फार मोठे कार्य कोरोना संसर्ग थांबविण्यासाठी सहाय्यभूत ठरले आहे.
यावेळी प्रभारी कुलगुरू विलास भाले यांनी स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ व पुस्तक देवून ना. सामंत यांचा विद्यापीठाच्यावतीने सत्कार केला. सुरुवातीला विद्यापीठ मुख्य प्रवेशद्वारासमोरील कर्मयोगी श्री. संंत गाडगे बाबांच्या संदेशशिल्पाला ना. सामंत यांनी पुष्पार्पण केले. त्यानंतर विद्यापीठ परिसरात त्यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. ना. सामंत यांनी ज्ञानस्त्रोत केंद्राच्या इमारतीत स्थापित कोविड प्रयोगशाळेला भेट देवून तेथील कार्याची पाहणी केली. त्याठिकाणी कार्यरत नोडल अधिकारी प्रशांत ठाकरे व इतरांशी चर्चा करुन प्रयोगशाळेतील कार्याची माहिती जाणून घेतली व तेथील सर्वांचे कौतुक केले.
---------------------
विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्यांसोबत चर्चा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांसोबत ना. उदय सामंत यांनी विविध शैक्षणिक व विकासात्मक बाबींवर चर्चा केली. यावेळी कुलगुरू विलास भाले, कुलसचिव तुषार देशमुख तसेच व्यवस्थापन परिषदेचे सदस्य उपस्थित होते.अधिसभागृहात अधिष्ठाता एफ.सी. रघुवंशी, अविनाश मोहरील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक हेमंत देशमुख, वित्त व लेखा अधिकारी भारत कहाड, दिनेशकुमार सातंगे, राजेश बुरंगे आदी उपस्थित होते.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------