अमरावती : मागील वर्षीपासून मजुरांच्या दरात झालेली वाढ, बिजोत्पादनाच्या खर्चात झालेली वाढ, चलनवाढ तसेच अन्य खर्चात वाढ झाल्याने बीटी कॉटन बियाण्यांच्या दरात वाढ करण्यासाठी शासनाच्या शिफारशीकरिता कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांच्या नित्कर्ष समितीचे गुरूवारी शासनाने गठन केले आहे. चलनवाढ, संशोधनावरील खर्चात झालेली वाढ, उद्योग शाश्वता यासह अन्य बाबींवरील वाढत्या खर्चामुळे नॅशनल सीड्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या संस्थेने फेब्रुवारी २0१४ मध्ये शासनाला पत्र पाठवून दरवाढ करण्याची विनंती केली होती. तत्पूर्वी महाराष्ट्र कापूस बियाणे (पुरवठा, वितरण, विक्री व विक्रीच्या किमतीचे निश्चितीकरण यांचे विनियन) अधिसूचना २00९ च्या कलम १0 अन्वये शासनाने कापूस पिकाचे बिजोत्पादनासाठी येणारा खर्च, स्वामित्व, शुल्क इत्यादी बाबींचा विचार करून बीटी कापूस वाणाच्या संकरित कापूस बियाण्याच्या कमाल विक्रीची किंमत अधिसूचनेद्वारे निश्चित केली होती. परंतु वाढत्या खर्चाच्या अनुषंगाने आढावा घेऊन नव्याने दर निश्चिती करण्यासाठी शासनास शिफारस करण्यासाठी तज्ज्ञांच्या समितीचे गठन करण्याचा निर्णय गुरूवारी शासनाने घेतला आहे. ही समिती बीटी बियाण्याच्या भाववाढीसंदर्भात निर्णय घेऊन शासनाकडे शिफारस करणार आहे. (प्रतिनिधी)
बीटी बियाण्यांच्या सुधारित दर निश्चितीसाठी समितीने गठन
By admin | Published: June 05, 2014 11:43 PM