पुणे येथील मुख्य कार्यपालन अधिकारी अध्यक्ष, वर्धा, चंद्रपूर, सातारा, बीड येथील अधिकाऱ्यांच्या समावेश
अमरावती : राज्यात जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदलीबाबत ग्रामविकास विभागाने धोरण निश्चित केले आहे. त्यानुसार आता सॉफ्टवेअर विकसित करण्यासाठी पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समितीची स्थापना करण्यात आली आहे. पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन प्रणालीव्दारे जिल्हांतर्गत आणि आंतरजिल्हा बदल्यांबाबत २०१७ मध्ये निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयामध्ये सुधारणा करण्याकरिता आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली ४ फेब्रुवारी २०२० रोजी समिती स्थापन करण्यात समितीच्या आली होती. या अहवालानुसार ७ एप्रिल २०२१ च्या शासन निर्णयानुसार सुधारित धोरण निश्चित करण्यात आले. मात्र आता पुढची प्रक्रिया पार पाडण्यासाठी सॉफ्टवेअर विकसित करण्याची गरज होती. यासाठीच ही नवीन समिती स्थापन करण्यात आली आहे. आयुष प्रसाद हे या समितीचे अध्यक्ष असून, सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, चंद्रपूरचे राहुल कार्डिले, वर्धा येथील सचिन ओंबासे, बीडचे अजित कुंभार यांचा या समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे. आता ही संगणक प्रणाली विकसित केल्यानंतर मग याबाबतची प्रक्रिया पार पडणार आहे. तोपर्यंत जिल्हा परिषदेच्या पातळीवर करावयाचीच कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
---------------------
समिती हे करावे लागेल काम
- शिक्षक बदली प्रक्रिया राबविण्यासाठी सॉफ्टवेअर विकसित करणे
- संगणकीय प्रक्रियेसाठी लागणाऱ्या रकमेचे अंदाजपत्रक तयार करणे
- अंदाजपत्रकानुसार निधीची शासनाकडे मागणी करणे
- बदली प्रक्रियेसाठी निविदा राबविणे
- संगणक प्रणालीची चाचणी घेणे
- संगणक प्रणालीचा प्रत्यक्षात वापर करणे.